मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ, त्यांना फडणवीसांचे बळ: मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 01:13 PM2024-07-09T13:13:00+5:302024-07-09T13:14:18+5:30
दिलेला ‘शब्द’ पाळा, छगन भुजबळांचे ऐकाल तर २८८ पडतील; मनोज जरांगेंचा इशारा
नांदेड : मराठा आरक्षणाचा खरे मारेकरी छगन भुजबळ हे असून त्यांना बळ देण्याचे काम देवेंद्र फडणवीस हे करत आहेत. पडलेल्या ओबीसींची एक टोळी गोळा करायचे काम तुम्ही भुजबळांना सांगितले अन् त्यातून मराठा-ओबीसी दंगली घडविण्याचा तुमचा डाव कधीही यशस्वी होणार नाही. आजही वेळ गेली नाही, तुम्ही दिलेला ‘शब्द’ पाळा. मराठ्यांना आरक्षण द्या, हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेतील. पण, भुजबळांचे ऐकून दगाफटका केला तर २८८ पडतील, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला.
नांदेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी नांदेड येथे आयोजित मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या समारोपप्रसंगी मनोज जरांगे बोलत हाेते. जरांगे पाटील म्हणाले, गाव-खेड्यातील मराठा आणि ओबीसी समाजात कधीही दुही निर्माण होणार नाही. परंतु, फडणवीस हे छगन भुजबळ यांना बळ देऊन पडलेल्या ओबीसी नेत्यांची एक टोळी जमा करत असून त्यांच्या माध्यमातून आंदोलने उभी करणं, गावागावात ओबीसी-मराठा दंगली घडवणं, असे डाव आखत आहेत. पण, ग्रामीण भागातील मराठा, ओबीसी हे सगळं ओळखून आहेत. त्यामुळे आमचं हे शांततेचं युद्ध शांततेनंच सुरू राहील आणि ते कुणालाच पेलणार नाही, असेही जरांगे म्हणाले.
याच मराठ्यांनी तुम्हाला १०६ आमदार दिले, हे तुम्ही विसरलात
फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचा द्वेष करू नका, आम्ही तुम्हाला कधीच विरोधक मानलं नाही की शत्रू. तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुम्ही सांगता, १९८० पासून ज्यांनी काहीच दिलं नाही हे आम्हाला पण माहीत आहे. तेच ते किती दिवस सांगणार, त्यांनी चूक केली ती तुम्ही दुरूस्त करा. तुम्ही १३ टक्के आरक्षण दिले तेव्हा तुम्हाला १०६ आमदार याच मराठ्यांनी दिले, हे तुम्ही विसरत आहात. आजही वेळ गेली नाही, वेळीच निर्णय घ्या. छगन भुजबळ यांचे ऐकाल तर महाराष्ट्रातून संपूर्ण भाजप संपेल एवढं लक्षात ठेवा, असा इशारा जरांगे यांनी दिला.
चंद्रकांतदादांना अधिसूचना वाचायला सांगा
सगे-साेयरे अन् नातेवाईक यांच्यातील फरक चंद्रकांतदादा पाटील यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांना एकदा अधिसूचना वाचायला सांगा, असे आवाहनदेखील जरांगे यांनी केले. तसेच चंद्रकांतदादा, गिरीष महाजन, छगन भुजबळ यांना वेळीच आवर घाला. त्यांना आमच्या अंगावर घालण्याचे काम करू नका, हे कोण करतंय ते आम्हाला कळतंय, असे सांगत त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.