जवळ असतानाही शहिदांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते हे दुर्दैव : धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 07:53 PM2019-02-20T19:53:11+5:302019-02-20T19:54:20+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे.
नांदेड : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात राज्यातील दोन जवान शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरु असताना मुख्यमंत्री त्या ठिकाणापासून जवळच होते, परंतु ते त्या ठिकाणी गेले नाही हे दुर्दैव असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यसंस्कारा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणापासून जवळच होते. मात्र ते अंत्यसंस्काराला गेले नाहीत हे दुर्दैव आहे. पुलवामा येथील हल्ला झाला असाच भ्याड हल्ला शिवाजी राजांच्या काळात झाला होता. त्यावेळी शिवाजी राजे इशारे देत बसले नाही, त्यांनी शाहिस्तेखानची याची बोटे छाटली. आता नियती आपल्या पाठीशी आहे, या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
'अच्छे दिन' वर लोक हसतात
प्रधानमंत्री मोदी यांनी जनतेला चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवले. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार होते, 15 पैसे ही आले नाही, बजेट मध्ये शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार देतो असे आश्वासन दिले. परंतु या फसव्या घोषणांना आता जनता बळी पडणार नाही. भाजपच्या काळात महागाईचा डोंगर उभा राहिला आहे. आता कोणी चांगले दिवस येतील म्हणाले तर लोक हसतात, असे खुद्द गडकरी यांनीच कबुल केले असल्याचे मुंडे म्हणाले.