प्रचंड तफावती असणारे मुख्यमंत्र्यांचे पंधरा पानी पत्र हे निव्वळ धूळफेक : संभाजी राजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 02:47 PM2021-08-20T14:47:03+5:302021-08-20T14:50:54+5:30
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विषयावर नांदेडात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले.
नांदेड- नांदेडच्या आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakarey ) यांनी मेलवरुन मला पंधरा पानी पत्र पाठविले. पंरतु या पत्रात मोठ्या प्रमाणात तफावती आहेत. त्यामुळे हे पत्र म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. बर पत्र द्यायचेच होते तर नांदेडचे पालकमंत्री आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan ) यांच्या हस्ते का दिले नाही? चव्हाणही आजच्या आंदोलनात कुठे दिसत नाहीत का? असा सवालही छत्रपती संभाजीराजे भोसले ( Sambhaji Raje ) यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation ) विषयावर नांदेडात शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी राजे बोलत होते. ते म्हणाले, यापूर्वी कोल्हापूर, नाशिक येथे आंदोलने झाली. त्या ठिकाणी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी संभाजीराजेंच्या मांडीला मांडी लावून जमिनीवर बसले होते. पत्र पाठवायचेच होते तर त्यावेळी का नाही पाठविले. आज नांदेडात मोर्चा म्हणून पाठविले काय? पाठविलेल्या पत्रातही अनेक तफावती आहेत. त्यामुळे यातून प्रामाणिकपणा दिसून येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्टया मागासलेला नाही. मग आरक्षण कसे मिळेल? त्यासाठी राज्याने अगोदर मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध करावे आणि केंद्राने पन्नास टक्यावरील आरक्षणाचे बघून घ्यावे. केवळ राज्य आणि केंद्राने एकमेकांवर ढकलाढकली करु नये. दुर्गम आणि डोंगराळ भागाचा मुद्दा घटना दुरुस्ती करुन वगळण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अन्यथा लाँग मार्च काढावा लागले
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यास येत्या काळात मुंबई, दिल्ली येथे लाँग मार्च काढावा लागले असा इशाराही संभाजी राजेंनी दिला. यावेळी भाजपाचे खा.प्रताप पाटील चिखलीकर, सेनेचे खा.हेमंत पाटील, आ.राम पाटील रातोळीकर, आ.तुषार राठोड, काँग्रेसचे आ.मोहन हंबर्डे, सेनेचे आ.बालाजी कल्याणकर, आ.शामसुंदर शिंदे, आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची उपस्थिती होती.