अवघे चिखलीकर कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:24 AM2019-04-06T00:24:02+5:302019-04-06T00:25:05+5:30
लोकसभा निवडणुकीत कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अख्खे चिखलीकर कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहेत.
नांदेड : लोकसभा निवडणुकीत कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अख्खे चिखलीकर कुटुंब मतदारसंघात प्रचार करीत आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात कंधार-लोहा हे तालुके समाविष्ट नाहीत. त्यामुळे चिखलीकरांना विधानसभेसाठी मतदान केलेल्या मतदारांना आता लोकसभेसाठी मात्र मतदान करता येणार नाही. कंधार-लोहा मतदारसंघ वगळून लोकसभेच्या प्रचारात आ. प्रताप चिखलीकरांसह त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई चिखलीकर, मुलगा प्रवीण पाटील चिखलीकर, मुलगी प्रणिता पाटील चिखलीकर, मेहुणा श्यामसुंदर शिंदे यांच्यासह बहीणही नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रचार करीत आहेत.
प्रताप पाटील चिखलीकर । भाजपा
लोहा विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा आमदार राहिलेल्या चिखलीकर यांना महायुतीची उमेदवारी दिली आहे. स्वत: ते जिल्हाभर प्रचार करीत आहेत. सभा, बैठका, गृहभेटीवरही त्यांचा जोर आहे.
पत्नी । प्रतिभाताई पाटील चिखलीकर
प्रतिभाताई या राजकारणात सक्रिय नसल्या तरी पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आपले पती प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी त्यांनीही जिल्हाभर गाठीभेटी सुरु केल्या आहेत.
मुलगा । प्रवीण पाटील चिखलीकर
जिल्हा परिषदेचे दोनवेळा सदस्य राहिलेल्या प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही आपले वडील प्रताप पाटील यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेद्वारे मतदारांपुढे जात आहेत.
मुलगी। प्रणिता पाटील-देवरे
जिल्हा परिषदेच्या पहिल्यांदा सदस्य झालेल्या प्रणिताताई चिखलीकर यांनी आपल्या वक्तृत्वशैलीतून मतदारांना आ. चिखलीकरांचे कार्य सांगत आहेत. या नेतृत्वाला जिल्ह्यात कार्य करण्याची संधी देण्याचे त्या आवाहन करीत आहेत.
मेहुणा। श्यामसुंदर शिंदे
सनदी अधिकारी राहिलेले श्यामसुंदर शिंदे हे चिखलीकरांच्या प्रचारात प्रमुख भूमिका बजावत आहेत. कार्यकर्त्यांना संघटित करुन ते चिखलीकरांसाठी मतदान मागत आहेत.