चिखलीकर म्हणाले, अशोकरावच नेते, खतगावकरांनी सभेत घेतले वदवून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 07:56 AM2024-03-25T07:56:22+5:302024-03-25T08:01:04+5:30
भर सभेत त्यांनी चिखलीकरांना उठवून अशोकरावांचे नेतृत्व मान्य करायला लावले.
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे अलीकडच्या महिनाभरापूर्वी पर्यंत विळ्या-भोपळ्याचे संबंध होते. त्यात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. परंतु चव्हाणांनी हाती कमळ धरताच या दोन्ही नेत्यांची दिलजमाई झाली. परंतु जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व कोण करणार अशी कुजबुज कार्यकर्त्यांत होती. त्यावर माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या कृतीने शनिवारी पडदा पडला. भर सभेत त्यांनी चिखलीकरांना उठवून अशोकरावांचे नेतृत्व मान्य करायला लावले.
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देत भाजप प्रवेशाचा सपाटाच लावला. त्यांच्या पाठाेपाठ भास्करराव खतगावकर आणि मीनल खतगावकर हे भाजपवासी झाले. चव्हाणांच्या शिफारशीवरून मीनल खतगावकर यांनी लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंगही लावली होती. त्यामुळे चिखलीकर समर्थक अस्वस्थ झाले होते. त्यात भाजपाने चिखलीकरांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे दादा मात्र नाराज झाल्याची चर्चा होती.
एका नेत्याच्या वाढदिवसाचे निमित्त करून चव्हाणांनी दादांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चाही केली. त्यानंतर विशेष विमानाने चव्हाण, खतगावकर, चिखलीकर हे लगोलग मुंबईला गेले. या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर दादांची नाराजी दूर झाली.
दोन्ही खासदार पडले बुचकळ्यात
बैठकीत भाजपचे सर्व आमदारही उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना खतगावकर यांनी प्रतापराव तुम्हाला उठून सांगायचे आहे की तुम्हाला अशोकरावांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. लोकांना आश्वासन द्या की इथून पुढे तुमच्यात आणि अशोकरावांमध्ये वाद होणार नाही, असे आवाहन केले. त्यांच्या या वाक्याने व्यासपीठावरील अशोकराव चव्हाण आणि चिखलीकर हेही काही क्षणासाठी बुचकाळ्यात पडले. परंतु खतगावकर यांनी पुन्हा चिखलीकरांकडे पाहत उठून सांगा, असे म्हणताच चिखलीकर ध्वनिक्षेपकाकडे गेले. यावेळी चिखलीकर म्हणाले, अशोकराव हे मोठे नेते आहेत. यापुढेही त्यांच्या नेतृत्वात काम करेल असे स्पष्ट केले. त्यांच्या वक्तव्याने दादांचे समाधान झाल्यानंतर दादांनी भाषण सुरू केले.