वयोवृद्ध आईचा मुलगा आणि सुनेकडून छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:49 AM2018-06-24T00:49:35+5:302018-06-24T00:50:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : वयोवृद्ध आईचा छळ करुन तिच्या नावे असलेले घर, शेत आपल्या नावावर करुन घेणाऱ्या मुलगा आणि सुनेविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण व कल्याण अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे़ या कलमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात ही पहिलीच कारवाई असावी़
जानकाबाई दाजीबा बंडाळे (वय ८०, रा़ विवेकनगर) असे वृद्ध महिलेचे नाव आहे़ त्यांचा मुलगा चंद्रकांत ऊर्फ बापू दाजीबा बंडाळे आणि सून सुनीता चंद्रकांत बंडाळे (मूळ रा़ गणपूर ता़अर्धापूर) यांनी २००८ पासून त्यांचा छळ सुरु केला़ जानकाबाई यांच्या नावावर असलेले विवेकनगर, नांदेड येथील २० खोल्यांचे घर आणि गणपूर येथील शेतीही मुलगा आणि सुनेने आपल्या नावावर करुन घेतले़ त्यानंतर त्यातील दोन खोल्या या जानकाबाई यांना राहण्यासाठी दिल्या़ परंतु, त्यानंतरही जानकाबाई घर सोडण्यास तयार नसल्यामुळे चिडलेल्या दोघांनी जानकाबाई यांच्या खोलीची नळजोडणी बंद केली़ तसेच वीजपुरवठाही तोडला़ जानकाबाई घर सोडून जावे, यासाठी मुलगा आणि सुनेने अनेकप्रकारे त्यांना त्रास दिला़ खर्चासाठी जानकाबाई यांनी पैसे मागितल्यास त्यांना शिवीगाळही करण्यात येत होती़ याबाबत जानकाबाई यांनी २२ जून रोजी भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले़ त्यानंतर मुलगा आणि सुनेच्या विरोधात तक्रार दिली़ या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी चंद्रकांत बंडाळे व सुनीता बंडाळे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे़ या प्रकरणाचा तपास पोना़व्ही़पी़आलेवार हे करीत आहेत़ दरम्यान, ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण या कलमाखाली नांदेडात हा पहिलाच गुन्हा असावा़
दरम्यान, मुलगा आणि सून गेल्या अनेक वर्षांपासून वृद्ध आईला त्रास देत होते़ त्याबाबत वृद्ध महिलेने अनेकवेळा पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजविले होते़ वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी याची दखल घेत महिलेचा मुलगा आणि सुनेची समजूत घातली होती़ परंतु, त्यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता़