चिमुकल्यांना हक्काचा निवारा मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:56 AM2019-05-09T00:56:31+5:302019-05-09T00:58:39+5:30
वाड्या-वस्त्यांवरील चिमुकल्यांना सकस पोषण आहाराबरोबरच शिक्षणाची सुविधा देण्यासाठी महिला व बालकल्याण एकात्मिक महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत
नांदेड : वाड्या-वस्त्यांवरील चिमुकल्यांना सकस पोषण आहाराबरोबरच शिक्षणाची सुविधा देण्यासाठी महिला व बालकल्याण एकात्मिक महिला विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येत आहेत. मात्र यातील ७१६ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने या चिमुकल्यांना हक्काचा निवारा मिळणार कधी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील पालकांसाठी त्यांच्या मुलांच्या दृष्टिकोणातून अंगणवाड्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या अंगणवाड्यामुळेच या चिमुकल्यांना बालवयात शिक्षणाचे धडे गिरविण्याची संधी मिळते. मात्र अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ४ हजार १६० अंगणवाड्यांची नोंद आहे. यातील ३ हजार ७७९ अंगणवाड्या मोठ्या तर ७६६ अंगणवाड्यांकडे मिनी अंगणवाड्या म्हणून पाहिले जाते. मात्र जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नसल्याने काही अंगणवाड्या गावातील चावडी, काही मंदिर अथवा समाजमंदिरात तर काही अन्य ठिकाणी सोयीनुसार भरविण्यात येतात. सध्या तापमानाचा पारा चढता आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम अंगणवाड्यावरही जाणवू लागला असून प्रशासनाने अंगणवाड्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
मागणी करूनही इमारतींसाठी निधी नाही
जिल्ह्यातील ४ हजार १६० अंगणवाड्यांपैकी १३८४ अंगणवाड्या या नगरविकास विभागाद्वारे चालविण्यात येतात. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ९४ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती असल्या तरी ७१६ अंगणवाड्यांना अद्यापही इमारतींची प्रतीक्षा आहे. याबाबतचे प्रस्ताव गावस्तरावरुन प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही इमारतीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.