चायनिज मांजाला पोलिसांची ढील; विक्रीमुळे वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:25+5:302021-01-02T04:15:25+5:30
कोरोनाच्या काळात प्रदूषण कमी झाले होते. त्यामुळे पशू-पक्ष्यांनीही मोकळा श्वास घेतला होता. त्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. ...
कोरोनाच्या काळात प्रदूषण कमी झाले होते. त्यामुळे पशू-पक्ष्यांनीही मोकळा श्वास घेतला होता. त्यानंतर आता लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. सणवार साजरे करण्यासही सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात मकरसंक्रांत आली आहे. या सणाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. परंतु ही पतंग उडवित असताना त्यासाठी वापरण्यात येणारा चायनिज मांजा पक्ष्यांसाठी मात्र जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे न्यायालयाने या मांजावर बंदी घातली आहे. परंतु नांदेडात सर्रासपणे या मांजाची विक्री करण्यात येते. त्यामुळे मानवासह पक्ष्यांचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता आहे.
हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे हिमालयात थंडी पडते. त्यामुळे अनेक पक्षी स्थलांतर करतात. नांदेडातही इतर राज्यातून अनेक पक्षी दाखल झाले आहेत. परंतु मकर संक्रांतीनिमित्त उडविण्यात येणारा पतंगासाठी वापरण्यात येणार्या चायनीज मांजा या पाहुण्या पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. नांदेडातील इतवारा भागात पंतग विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. या ठिकाणी सर्रासपणे चायनिज मांजाची विक्री करण्यात येते. मागील वर्षी या चायनिज मांजामुळे जवळपास सव्वाशेहून अधिक पक्ष्यांचा जीव गेला होता. तर पंधरा नागरिक जखमी झाले होते. सुदैवाने यामध्ये कुणा नागरिकाचा जीव गेला नाही.
परंतु पोलिसांकडून या मांजा विक्रेत्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नागरिकांनीही चायनीज मांजा न वापरता इतर दो-यांचा वापर करण्याची गरज आहे.
चायनिज मांजा पाहुण्या पक्ष्यांच्या जीवावर बेतते
हिमालयातून सध्या फेन्टेल, करकोची, पेन्टे स्टार्क, बॅकल स्पार्क, उकीन नेकड, ईबीजी आणि गोल्डन डक आदी अनेक जातीचे पक्षी सध्या नांदेडात दाखल झाले आहेत. हे पक्षी पाणथळ आणि झाडांवर आपली घरटी बांधतात. परंतु चायनिज मांजामुळे या पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. त्यामध्ये अनेक पक्ष्यांचा जीव जातो. या प्रकारामुळे निसर्गाची मात्र अपरिमित हानी होते. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
मांजामुळे पक्षी मृत्युमुखी
चायनिज मांजा हा फार मजबूत असतो. त्यामुळे पतंगप्रेमींची काटाकाटी खेळण्यासाठी त्यालाच अधिक पसंती असते. परंतु हाच मजबूत मांजा पक्ष्यांच्या मानेवरून किंवा पंखावरून फिरल्यास त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते. मानेवरून हा मांजा फिरल्यास त्यामध्ये पक्ष्यांचा जीव जाण्याचे प्रमाण अधिक आहे.