चिटफंडची चिटिंग कोट्यवधीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:50 AM2019-02-09T00:50:08+5:302019-02-09T00:51:23+5:30
चिटफंडमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवित संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे़ फसवणुकीचा हा आकडा सध्या लाखात असला तरी, तो लवकरच कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे़ ३० हप्त्यांच्या भिशीत गुंतवणूकदारांनी जवळपास २६ हप्ते भरले आहेत़ परंतु, चिटफंडच्या या कार्यालयाला आता टाळे असल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़
नांदेड : चिटफंडमध्ये गुंतवणूक केल्यास दामदुप्पट लाभ देण्याचे आमिष दाखवित संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे़ फसवणुकीचा हा आकडा सध्या लाखात असला तरी, तो लवकरच कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे़ ३० हप्त्यांच्या भिशीत गुंतवणूकदारांनी जवळपास २६ हप्ते भरले आहेत़ परंतु, चिटफंडच्या या कार्यालयाला आता टाळे असल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़
शहरात खाजगी भिशी अनेकजण चालवितात़ गटागटाने भिशीचे हे उद्योग सुरु असून यामध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणे सर्वात महत्त्वाचे असते़ संतकृपा मार्केटमधील मुंदडा चिटफंडने नेमके हेच हेरुन अगोदर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी गुंतवणूकदारांना भिशीचे पैसे दामदुपटीने परत दिले़ चिटफंड ही कंपनी नोंदणीकृत असून यामध्ये गुंतवणूकदारांच्या एक पैशालाही धक्का लागणार नाही, याची खात्री पटवून देण्यात आली़ मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीसाठी अल्पावधीत गुंतविलेल्या रकम दामदुप्पटीने परत दिली जाईल, असे आमिष दाखविण्यात आले़ त्यामुळे शासकीय नोकरदारांपासून ते व्यापाऱ्यांसह अनेकांनी यामध्ये पैसे गुंतविले़ ३० हप्त्यांच्या या भिशीत जवळपास २६ हप्त्यापर्यंत रक्कम गुंतवणूकदारांनी भरली होती़ ही रक्कम लाखाच्या घरात आहे़ २६ हप्ते झाल्यानंतर रजिस्ट्रार कार्यालयात नोंद करावयाची आहे असे सांगून गुंतवणूकदारांकडील सर्व डाय-या ताब्यात घेण्यात आल्या़ त्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकून मुंदडा कंपनीने पळ काढला़ या विरोधात गुंतवणूकदारांनी मुंदडाच्या विरोधात पोलिसांकडे धाव घेतली़ परंतु गुन्हा नोंद करण्यात आला नाही़ शेवटी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले़
न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंदडा चिटफंडच्या संचालकाविरोधात गुन्हे नोंदविण्याचे आदेश पोलिसांना दिले़ या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत़ या सात जणांनी जवळपास १७ लाख रुपये चिटफंडमध्ये गुंतविले होते़ येत्या काळात फसवणुकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे़