विष्णूपुरी रुग्णालयात अंतर्गत वादातून सिटी स्कॅनला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:05 AM2018-11-08T00:05:51+5:302018-11-08T00:08:49+5:30
गेल्या अडीच महिन्यांपासून बंदच आहे़ महाविद्यालय प्रशासन आणि सिटीस्कॅन कंपनीच्या अंतर्गत वादात या मशीनची दुरुस्ती रखडली आहे़ त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून सिटीस्कॅनच्या तपासणीसाठी त्यांची खाजगीत आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे़
नांदेड : विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अत्याधुनिक सिटीस्कॅन मशीन दुरुस्तीअभावी गेल्या अडीच महिन्यांपासून बंदच आहे़ महाविद्यालय प्रशासन आणि सिटीस्कॅन कंपनीच्या अंतर्गत वादात या मशीनची दुरुस्ती रखडली आहे़ त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून सिटीस्कॅनच्या तपासणीसाठी त्यांची खाजगीत आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे़ याबाबत प्रशासनही फारसे गंभीर नसल्याचेच दिसत आहे़
शहरात असलेल्या डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे साधारणत: दोन वर्षांपूर्वी विष्णूपुरी येथे स्थलांतर झाले़ त्यावेळी स्थलांतरापूर्वीच अनेक महिने यंत्र व इतर साहित्य खरेदीचा सपाटा सुरु करण्यात आला होता़
प्रत्यक्षात महाविद्यालय आणि रुग्णालय इमारतींची अनेक कामेही त्यावेळी पूर्ण झाली नव्हती़ अशावेळी कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री मात्र येवून पडली होती़ त्यामध्ये जवळपास २५ कोटी रुपयांच्या सिटीस्कॅन मशीनचाही सहभाग होता़ शहरात रुग्णालय असताना या ठिकाणी अस्तित्वात असलेली जुनी सिटीस्कॅन मशीन सुरु असल्यामुळे नवीन मशीन कार्यान्वित करण्यात आली नव्हती़ त्यामुळे अनेक महिने ही मशीन धूळखात होती़ त्यातच त्याच्या देखभाल अन् दुरुस्तीत बरेच महिने असेच वाया गेले़
महाविद्यालय आणि रुग्णालयाचे विष्णूपुरी येथे स्थलांतरण झाल्यानंतर या ठिकाणी नवीन सिटीस्कॅन मशीन सुरु करण्यात आली़ परंतु, त्यामध्ये वेळोवेळी तांत्रिक बिघाड येत होता़ दुरुस्तीसाठी लागणाऱ्या रकमेवरुन अनेकवेळा कंपनीचे अधिकारी आणि महाविद्यालय प्रशासन यामध्ये समन्वय होत नव्हता़ त्याचा परिणाम म्हणून अनेक दिवस या विभागाला टाळेच लावावे लागत होते़ आता पुन्हा एकदा गेल्या अडीच महिन्यांपासून याच कारणामुळे ही मशीन बंद आहे़
संबंधित विभाग मात्र दिवाळीनंतर मशीनची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगत आहे़ परंतु, प्रत्यक्षात ती कधी सुरु होईल, याबाबत साशंकताच आहे़ यामध्ये रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत़ रुग्णांना हजारो रुपये मोजून बाहेरुन या तपासण्या कराव्या लागत आहेत़
गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक
शासकीय रुग्णालयात शेजारील तेलंगणासह हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यांतून रुग्ण उपचारासाठी येतात़ यामध्ये अपघाताच्या रुग्णांची संख्याही अधिक असते़ त्यामुळे अशा रुग्णांची सिटीस्कॅन तपासणी होणे गरजेचे असते़
परंतु, या ठिकाणी मशीन बंद असल्यामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला पुन्हा रुग्णवाहिकेतून शहरातील खाजगी सिटीस्कॅन केंद्रात तपासणीसाठी आणावे लागते़ यामध्ये रुग्णाच्या जीविताला धोकाही निर्माण होवू शकतो़ त्याचबरोबर खाजगीत तपासणीसाठी एका रुग्णाकडून साधारणत: दोन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपये दर आकारले जाते. त्यामुळे गरीब रुग्णांची आर्थिक पिवळणूक होते़ परंतु, या गंभीर प्रकाराबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघेही फारसे गंभीर नसल्याचेच दिसत आहे़