नांदेडमध्ये आरोपी अन् पोलिसांमध्ये चकमक; खदानीजवळ फिल्मी स्टाइल गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:39 IST2025-02-28T19:39:27+5:302025-02-28T19:39:54+5:30
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गावठी कठ्ठ्यातून गोळीबार

नांदेडमध्ये आरोपी अन् पोलिसांमध्ये चकमक; खदानीजवळ फिल्मी स्टाइल गोळीबार
मारतळा (जि. नांदेड) : सिडको भागात एकावर धारदार शस्त्राने हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकांवर आरोपीने गावठी कठ्ठ्यातून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, तर पोलिसांनीदेखील स्वरक्षणार्थ आरोपीच्या दिशेने पिस्टलमधून दोन फायर केले. यात आरोपीच्या उजव्या पायास गोळी लागली. ही घटना बुधवारी (दि. २६) मध्यरात्रीनंतर २ वाजता झरी (ता. लोहा) येथील खदानीजवळ घडली.
बुधवारी कृष्णासिंग बावरी याच्यावर अविनाश ऊर्फ भय्या माधवराव मिरासे (२८, रा. दत्तनगर, सिडको) याने तलवारीने प्राणघातक हल्ला केला. यात कृष्णा बावरी हा गंभीर जखमी झाला. त्यांनतर आरोपी अविनाश घटनास्थळावरून फरार झाला. तो झरी येथील खदानीजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सोनखेड पोलिस ठाण्याचे सपोनि पांडुरंग माने पथकासह मध्यरात्रीनंतर सदर ठिकाणी गेले.
आरोपीच्या दिशेने दोन राउंड फायर
पोलिस पथक दिसताच येथे मद्यपान करीत बसलेला आरोपी अविनाश ऊर्फ भय्या माधवराव मिरासेनी त्याच्याजवळील गावठी कट्ट्यातून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी प्रसंगावधान राखून सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांनी स्वयंसंरक्षणार्थ आरोपीच्या दिशेने दोन राउंड फायर केले. त्यातील एक गोळी आरोपी अविनाशच्या उजव्या पायास लागली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय साईनाथ पुयड यांच्या पथकाने जखमी अविनाश मिरासे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्याच्यासोबतचा सहकारी मात्र पसार झाला.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक माने यांनी दिली. सदर आरोपी यापूर्वी विरुद्ध शिवाजीनगर, विमानतळ, वजिराबाद, ग्रामीण पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे १८ गुन्हे दाखल आहेत.