नृत्यवेड्या तरुणांचा संघर्ष रंगमंचावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:44 AM2018-11-21T00:44:47+5:302018-11-21T00:46:46+5:30

या नव्या क्षेत्रात उतरताना या तरुणांची होणारी घुसमट ‘नाच्या कंपनी’ या नाट्यप्रयोगाने अत्यंत प्रखरपणे समाजासमोर मांडली. कला क्षेत्रातील राजकारणावरही या नाटकाने बोलके भाष्य केले.

Clash of the Dancerous Youth on Theater | नृत्यवेड्या तरुणांचा संघर्ष रंगमंचावर

नृत्यवेड्या तरुणांचा संघर्ष रंगमंचावर

googlenewsNext
ठळक मुद्देहौशी राज्य नाट्यस्पर्धा कलाक्षेत्रातील राजकारणावर केले प्रभावी भाष्य

नांदेड : झोपडपट्टीत वास्तव्यास असलेले नृत्यवेडे युवक आपल्या स्वप्नांना साकारण्यासाठी करीत असलेला संघर्ष रंगमंचावर मांडतानाच या नव्या क्षेत्रात उतरताना या तरुणांची होणारी घुसमट ‘नाच्या कंपनी’ या नाट्यप्रयोगाने अत्यंत प्रखरपणे समाजासमोर मांडली. कला क्षेत्रातील राजकारणावरही या नाटकाने बोलके भाष्य केले.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येथील कुसुम सभागृहात ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी सुरु आहे. ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड यांच्या वतीने राहुल जोंधळे लिखित, दिग्दर्शित ‘नाच्या कंपनी’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. झोपडपट्टीत वास्तव्यास असलेले नृत्यवेडे तरुण या नृत्याच्या आवडीत करिअर शोधतात. आणि आपले स्वप्न साकारण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु होतो. हाच संघर्ष अत्यंत बोलकेपणाने या नाटकात मांडण्यात आला आहे.
रोजच्या जगण्यातील प्रश्न समोर उभे असताना, कला क्षेत्रातील नवीन बाजारपेठेत उतरताना या युवकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. विशेषत: कलेची कसलीही पार्श्वभूमी नसलेले हे तरुण राजकारणापासून अनभिज्ञ असतात. मात्र कलाक्षेत्रातील राजकारणाला त्यांना सामोरे जावे लागते. त्यातून होणारी या युवकांची घुसमट समाज व्यवस्थेवर प्रभावी भाष्य करते.
प्रयोग सादर करणारे सर्वच युवक अत्यंत सफाईदारपणे नृत्य करतात, ही या नाटकाची जमेची बाजू. हे नाटक कला क्षेत्रातील राजकारणावर प्रकाश टाकते. सूचक नेपथ्य, आशयानुरूप रंगभूषा, वेशभूषा, कलात्मक दिग्दर्शन यामुळे नाटक आणखीनच प्रभावशाली ठरते. शुभम कळसकर, सुभाष जोगदंड, विजय भालेराव, नागसेन गायकवाड, करण गुडेवार, संदेश वाघमारे, अनिल दुधाटे, सचिन वानोळे, मारुती गजभारे, नितेश मोरे, दत्ता जिंके, अंकुष लांडगे, वसुंधरा कदम, पूजा परमार, हर्षा भुरे, श्वेता रणबावळे, श्रुती अकोलकर, विश्रांत लष्करे, अजय ठाकूर, शुभम मगरे, भगवान पवार, ओमकार पवार, श्रेयस कुलकर्णी, सम्राट डोईबळे आदित्य जोंधळे, अविनाश जगदळे, सुरज गवळे, अमोल भालेराव, लक्ष्मण माने यांनी भूमिका उत्तमरित्या साकारल्या. तर चंद्रकांत तोरणे विजय गजभारे यांची भूमिका लक्षवेधी ठरली. प्रकाशयोजना नारायण त्यारे तर नेपथ्य माणिकचंद थोरात, सचिन कानोडे, रंगभूषा- ज्योतिबा हनुमंत, वेशभूषा- सुरज नगारे, संगीत- शेख कलिम यांनी साकारली.

  • या स्पर्धेस रसिक प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २१ नोव्हेंबर रोजी धनंजय शिंगाडे बहु. सामाजिक संस्था, उस्मानाबाद यांच्या वतीने उदय कात्नेश्वरकर लिखित, विशाल शिंगाडे दिग्दर्शित ‘चक्रव्युह’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

Web Title: Clash of the Dancerous Youth on Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.