शहर स्वच्छतेची कोंडी सुटली
By admin | Published: November 3, 2014 03:06 PM2014-11-03T15:06:07+5:302014-11-03T15:06:07+5:30
स्वच्छ भारत अभियानाच्या काळात शहरात जिथे कचर्याचे ढिग असतील ते काढण्यात येतील. तसेच मनपाच्या सर्व कार्यालयातून स्वच्छता मोहिम राबवली जाईल.
Next
नांदेड: स्वच्छ भारत अभियानाच्या काळात शहरात जिथे कचर्याचे ढिग असतील ते काढण्यात येतील. तसेच मनपाच्या सर्व कार्यालयातून स्वच्छता मोहिम राबवली जाईल. मनपाने ५0 सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यापैकी २५ स्वच्छतागृह बीओटी तत्वावर बांधून वापरायला सुरूवात झाली आहे. या स्वच्छतागृहांची दुरूस्ती रंगरंगोटी केली जाईल. तसेच त्यात सुधारणा करण्यात येईल.
स्वच्छता हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मनपाने शहरातील सहा झोन मध्ये वेगवेगळा संदेश देणारे फलक उभारणे, कार्यालये, दवाखाने, बसेस अशा ठिकाणी पोस्टर्स लावणे, मनपातील अधिकारी, पदाधिकारी यांना सूचना देऊन या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी नियोजन करणे, बिल कलेक्टरच्या हातून नांदेडच्या तमाम मालमत्ता धारकांपर्यंत हा संदेश देणारी पत्रके वाटणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. .
शहरात घनकचर्याच्या ढिगार्यातच जैविक कचरा टाकला जातो. यामध्ये मोठय़ा प्रमाणात अपायकारक औषधी, सिरिज आहे. मोकाट जनावरे हा धोकादायक जैविक कचर खातात. सर्रासपणे जैविक कचर्याची उघड्यावर विल्हेवाट लावून जबाबदारी टाळणार्या रूग्णालयावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त मुंडे यांनी सांगितले.
■ मनपाकडून एटूझेडचे तीन महिन्यापासून बील थकल्याने कामात आला व्यत्यय
> शहरात मॅकेनिक रोडस्विपरद्वारे होणार रस्त्यांची साफसफाई
> स्वच्छतेचे महत्व सांगण्यासाठी जनजागृती करणार
> रात्रीच्या वेळी उचलणार कचरा
> स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालयाचा घेणार सहभाग
> कॉल करताच कचरा उचलण्यासाठी येणार एटूझेडचे स्वच्छता कामगार
मॅकेनिक रोडस्विपरद्वारे रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे. १ रिफ्युज कॉम्फ्ॅकटर, कचरा उचणारे ७५ वाहने व १0 टाटा एस यासह मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेचे महत्व सांगण्यासाठी कंपनीकडूनच जनजागृती मोहिम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी घरोघर प्रसिद्धी पत्रके व वार्डात ध्वनीक्षेपकावर आवाहन करण्यात येणार आहे. देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. नांदेड शहरातही महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी एटूझेड कंपनीने यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात दररोज तीन टप्यात स्वच्छतेचे काम करण्यात येणार आहे. वाहनांची संख्या वाढवून रात्रीच्या वेळी मुख्य रस्ते, वर्दळीचे ठिकाणे तसेच हॉटेल परिसरातील कचरा उचलण्यात येणार आहे. चार वर्षापूर्वी जय स्वच्छतेचा नारा देत नांदेडकरांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवून देशभरात आदर्श निर्माण केला होता. मात्र आता हा नारा पुन्हा एकदा नांदेडकरांना द्यावा लागणार आहे. काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी सर्रास कचरा टाकण्यात येत आहे. सुंदर शहराची संकल्पना घेवून नांदेडला नवे रूप देण्यात आले. विकासाचे चक्र गतीमान होवून अवघ्या चार वर्षात शहराचा कायापालट झाला. परंतु आता या शहराच्या स्वच्छता व सौंदर्याची जबाबदारी मनपा प्रशासनासोबतच नागरिकांवर आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान योजनेचा प्रारंभ शहरात करण्यात आला असून योजनेतंर्गत आराखडा तयार करण्यात आला आहे. २ ऑक्टोबरपासून शहरात स्वच्छतेची मोहिम राबवण्यात येत आहे. यासंदर्भात सहायक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे म्हणाले, मनपा व एटूझेड कंपनीच्या समन्वयातून स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत. तसेच स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय व नागरिकांच्या मदतीने स्वच्छता मोहिमेचा उपक्रम राबवण्यात येईल. यापुढे व्यापार्यांनी रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेवर कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ऐन दिवाळीच्या काळात आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे यांनी काम बंद ठेवल्याच्या कारणामुळे एटूझेड सोबतचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महापालिकेने स्वत: शहर स्वच्छ करण्याची घोषणाही केली होती. परंतु यंत्रणा राबवण्यास असर्मथ असलेल्या महापालिकेने एटूझेड कंपनीकडेच काम सपूर्द करीत यापुढे स्वच्छतेच्या कामात गती देण्याच्या सूचना केल्या.
महापालिकेने कंपनीचे गत तीन महिन्यापासून बील दिले नाही. त्यामुळे कंत्राटदाराकडून स्वच्छता कामगारांना वेतन मिळाले नाही. त्यामुळे दिवाळीत एक दिवस काम बंद राहिले होते. हा विषय पुढे आल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी व मनपा प्रशासनाच्या चर्चेनंतर शहरातील स्वच्छतेच्या कामाचे नियोजन करण्यात आले.
नांदेड: महापालिकेने शहर स्वच्छतेच्या कामात नव्या सुधारणा करण्याच्या सूचना केल्यानंतर एटूझेड कंपनीने कामात बदल करीत स्वच्छतेसाठी अंग झटकले आहे. त्यामुळे महापालिका व एटूझेड मध्ये सुरू असलेला वाद संपुष्टात येऊन स्वच्छ नांदेडचा मार्ग मोकळा झाला आहे.
नांदेड: स्वच्छ भारत अभियानातंर्गत शहरात रविवारी ठिकठिकाणी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. यामध्ये नावघाट, चौफाळा व महापालिकेच्या इमारतीत स्वच्छतेचे काम करण्यात आले. त्यामुळे स्वच्छतेसाठी आज अनेक हात सरसावलेले पाहण्यास मिळाले.
गोदावरी नदीघाटांची स्थिती चांगली नाही. सध्या मनपा व नेचर क्लबच्या वतीने घाट स्वच्छतेची मोहिम चालू आहे. परंतु ती अधिकाधिक व्यापक होणे काळाची गरज आहे. त्यानुसार शहर स्वच्छतेसाठी आता विविध संस्था, संघटना व नागरिकांनी पुढाकार घेत आहेत. माँ गोदावरी स्वच्छता अभियानांतर्गत दर रविवारी नावघाट परिसरात स्वच्छता करण्यात येते. २२ ऑगस्टपासून आरती पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली नावघाट परिसरात गोदावरी नदीकाठावर स्वच्छता केली जाते. आजही या ग्रुपने स्वच्छता केली. दिवाळीच्या सुट्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य, एनएसएस, एनसीसी स्काऊट गाईडचे प्रमुखांची बैठक घेवून त्यांना वेगवेगळे घाट दत्तक म्हणून दिले जातील.
दोन दिवसांपासून काही वार्डात नगरसेवकांनी हातात झाडू घेवून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. चौफाळा व नवामोंढा येथे स्वच्छता करण्यात आली.
रविवारी महापालिकेच्या सर्व कार्यालयातून स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यामध्ये जुने नको असलेल्या फर्निचर आणि रेकॉर्ड काढून टाकण्यात आले. यावेळी बीएसयुपी विभागातील जुने साहित्य, जुने फर्निचर काढण्यात आले. आज सुट्टीचा दिवस असतानाही मनपातील सर्व कर्मचारी आपापल्या कार्यालयातील अडगळीत पडलेले साहित्य काढताना दिसत होते. दुपारनंतर मनपातील सर्व कार्यालयांचा चेहरा- मोहरा बदलला होता. आयुक्त डॉ. निशिकांत देशपांडे व उपायुक्त राजेंद्र खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची मोहिम राबवण्यात आली. (प्रतिनिधी)/
महापालिकेकडे आवश्यक यंत्रणेचा अभाव असल्यामुळे स्वत: काम करणे अशक्य होते. त्यामुळे एटूझेड कंपनीसोबत नव्या सुधारणा करून स्वच्छतेचे काम करण्यात येईल. एटूझेड कडूनही व्यवस्थित काम करण्याचे आश्वासन मिळाले आहे. मनपाकडून तीन महिने बील थकल्यामुळेच मध्यतंरी अडचणी आल्या. आता वसुलीवर लक्ष्य दिल्यामुळे स्वच्छतेच्या कामात आर्थिक अडचण येणार नाही.
- डॉ. निशिकांत देशपांडे, आयुक्त मनपा, नांदेड
एटूझेड कंपनीकडून नांदेड शहरात मागील तीन वर्षापासून स्वच्छतेचे काम सुरू आहे. या दिवाळीत एक दिवस काम बंद राहिले. याचे कारण मनपाकडून तीन महिन्यापासून बील मिळाले नाही. त्यामुळे कामगारांनाही वेतन मिळू शकले नाही. पैसे वेळेवर मिळाल्यास अशी अडचण येणार नाही. यापुढे स्वच्छतेची मोहिम राबवण्यासाठी कंपनीकडून यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. या शहरात काम करण्याची एटूझेडची मनापासून इच्छा आहे.
- दीपक रावत, प्रमुख, नॅशनल सीएनटी, (एटूझेड.)