‘महाराजस्व’ अभियानांतर्गत रस्ता मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:13 AM2021-06-18T04:13:56+5:302021-06-18T04:13:56+5:30
संदीप केंद्रे यांची निवड किनवट : दक्षिण मध्य रेल्वेच्या यूजर कन्स्टिटिट्यूट समितीवर किनवट भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांची नियुक्ती ...
संदीप केंद्रे यांची निवड
किनवट : दक्षिण मध्य रेल्वेच्या यूजर कन्स्टिटिट्यूट समितीवर किनवट भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे यांची नियुक्ती झाली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शिफारशीने ही नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले.
मुस्लीम समाजाला आरक्षण द्या
भोकर : शिक्षण व नोकरीत मुस्लीम समाजाला १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर माजीद लाला, हकीम करीम, ॲड. सलीम, ॲड. मुजाहीद, लतीफ शेख, इलियास कुरेशी, एजाज कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
बिलोली बसस्थानकात मास्क वाटप
बिलोली : येथील बसस्थानकात युवा सेनेच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख विक्रम साबणे, बाबाराव पाटील, शंकर मावलगे, संतोष पाटील, दिनेश एडके, वसंत जाधव, काशीनाथ रेड्डी, बालाजी मेढेकर, राजू रेड्डी, भाऊसाहेब बनबरे यांची उपस्थिती होती.
देगलूरला वृक्षारोपण
देगलूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विशालनगर सोसायटीमधील संत तुकाराम शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुक्ताई प्रतिष्ठानचे सचिव राजेश महाराज देगलूरकर, बार्टीच्या सुजाता पोहरे, उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, प्रा. विठ्ठल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
हिमायतनगर : हिमायतनगर ते इस्लापूर दरम्यान खैरगाव फाट्याजवळ बोधडीकडे जाणाऱ्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. राम राचटकर असे जखमीचे नाव आहे. या क्रमांकाच्या कारने दुचाकीला धडक देऊन काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यात राचटकर यांचा पाय निकामी झाला आहे.
घरकुलधारकांना चावी
मुदखेड : बारड ग्रामपंचायतीतील भारतीनगर व भीमनगर येथील घरकुल लाभार्थ्यांना बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख, बीडीओ केंद्रे, विस्तार अधिकारी गायकवाड यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या. ज्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले अशा घरकुलांच्या लाभार्थ्यांचा गृहप्रवेश कार्यक्रम पंचायत समिती मुदखेड व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. यावेळी सरपंच प्रभाकर आठवले, अभियंता राहुल गुमाने, दिगंबर टिप्परसे, अवधूत शीरगीरे आदी उपस्थित होते.
वळणरस्ता तयार
भोकर : भोकर-उमरी रस्त्यावरील रायखोड पुलाचे काम सुरू असल्याने वळण रस्ता तयार करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच्या पावसाने सदर वळण रस्ता वाहून गेल्याने लोकांची बरीच गैरसोय झाली होती. त्यामुळे पुन्हा वळण रस्ता करण्यात आला.
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
लोहा : तालुक्यातील शेलगाव येथे शेतातील रस्त्यावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना १५ जून रोजी दुपारी घडली. सोनखेड पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. संजय कदम, राजू कदम, गजू कदम, विजय कदम, श्रीपती कदम, हरी कदम, हणमंत कदम, यशवंत कदम अशी आरोपींची नावे आहेत. सोनखेड पोलीस तपास करीत आहेत.
सावंत यांना निरोप
मालेगाव : मालेगाव डाक विभागातील पोस्टमन गंगाधर सावंत सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी पोस्टमन कल्पना बेलेकर, जी. एस. बडुरे, आनंद कोल्हे, नारायण यशवंते, नितेश पंडित, भीमराव इंगोले आदी उपस्थित होते.
औषधी कीट दिली भेट
सगरोळी : मूळचे सगरोळी येथील व सध्या मुंबई येथे असलेले अजित केसराळीकर यांनी सगरोळी प्रा. आ. केंद्राला औषधी, गोळ्या, इंजेक्शनचे कीट भेट म्हणून दिल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी सातमवार, राज केसराळीकर, कुमार पाटील, देवीदास कोंडलवाडे आदी उपस्थित होते.
इमारत अंगणवाडीच्या ताब्यात
निवघा बाजार : मौजे शिरड येथील ग्रामपंचायतने अंगणवाडीची इमारत ताब्यात दिली. तीन वर्षांपासून अंगणवाडीच्या इमारतीचे काम सुरू होते. एक वर्ष लोटले, अंगणवाडी हस्तांतरित झाली नव्हती. यादरम्यान अंगणवाड्या समाजमंदिरात भरत होत्या. याबाबत रामेश्वर बोरकर यांनी सरपंच शरद चौरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चौरे यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांची बैठक बोलावून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली.
पुलाची झाली दुर्दशा
जाहूर : देगलूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलावरील दुर्दशा झाली. या पुलासाठी निधी मंजूर झाला. मात्र दुरुस्ती झाली नाही. पावसाळ्यात वाहतूक करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने एखादी दुर्घटनाही घडू शकते. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घ्या
मुखेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. जे विद्यार्थी ऑनलाइन घेऊ शकत नाहीत अशांची त्या त्या महाविद्यालयात ऑफलाइन परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी पवन जगडमवार यांनी केली. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला. वीज नसणे, नेटवर्क नसणे आदी प्रकार वारंवार घडतात. अशावेळी परीक्षा द्यायची कशी? असा सवाल त्यांचा आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सहस्त्रकुंडला भेट
इस्लापूर : गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सहस्त्रकुंडला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी इस्लापूर प्रा. आ. केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या इमारतीची पाहणी केली. ३० जूनपर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण झाले पाहिजे, अशी समजही त्यांनी वैद्यकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्यांना दिली.