राज्यभर व्याप्ती असलेल्या नोकर भरती घोटाळ्यात लिपिक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 05:27 PM2020-02-01T17:27:58+5:302020-02-01T17:32:53+5:30
उमेदवाराच्या जागी अन्य व्यक्तीला बसवून नोकरी मिळवून देण्याच्या प्रकाराचा किनवट तालुक्यात पर्दाफाश करण्यात आला होता़
नांदेड : राज्यभर गाजलेल्या एमपीएससी आणि नोकरभरती घोटाळ्यात आतापर्यंत २०० जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ त्यात गुन्हे अन्वेषण विभागाने गोंदिया येथून निखिल चव्हाण या लिपिकाला अटक केली आहे़ या प्रकरणातील मुख्य आरोपी तुरुंगात आहे़
कोणत्याही नोकरीची जाहिरात निघाल्यानंतर उमेदवाराच्या जागी अन्य व्यक्तीला बसवून नोकरी मिळवून देण्याच्या प्रकाराचा किनवट तालुक्यात पर्दाफाश करण्यात आला होता़ योगेश जाधव या तरुणाने हे रॅकेट उघडकीस आणले होते़ त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत वर्ग- १ पासून ते वर्ग- ४ पर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे़ आरोपी उमेदवाराकडून पदनिहाय रक्कम घेत होते़ मुख्य आरोपी प्रबोध मधुकर राठोड हा एमपीएससी आणि नोकर भरती घोटाळ्याचे रॅकेट चालवित होता़
उमेदवाराच्या जागी डमी परीक्षार्थी बसवून नोकरी मिळवून दिली जात होती़ हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक यासह इतर विभागांतील अनेकांना यामध्ये आरोपी करण्यात आले होते़ आतापर्यंत राज्यभरात या प्रकरणात २८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ तर तब्बल २०० जणांना अटक करण्यात आली आहे़ नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या याच प्रकरणातील गुन्ह्यात गुन्हे अन्वेषण विभागाने गोंदिया येथील लिपीक निखिल चव्हाण याला अटक केली आहे़ चव्हाण याच्या जागी अन्य एकाला डमी उमेदवार म्हणून बसविण्यात आले होते़ पोलीस उपअधीक्षक साळुंके यांनी ही कारवाई केली़ गेल्या अडीच वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरुच आहे.
शेत, घर विकून दिले होते अनेकांनी पैसे
शासकीय नोकरी लागावी म्हणून अनेकांनी परिस्थिती नसतानाही घर, शेत यासह जवळील दागिने विकून लाखो रुपयांची रक्कम गोळा केली होती़ त्यानंतर ही रक्कम राठोड याला देण्यात आली होती़ राठोडकडून उमेदवाराच्या जागी परीक्षेसाठी डम्मी उमेदवार उपलब्ध करुन दिला जात असे़ परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उर्वरित रकमेचा शेवटचा हप्ता दिला जात होता़ अशाप्रकारे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यासह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये राठोड याने अनेकांना नोकरी मिळवून दिली. परंतु या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर अशाप्रकारे पैसे देऊन नोकरीला लागलेले अडचणीत आले आहेत.