मुख्यमंत्री शिंदेंचे खासगी सचिव निवडणुकीच्या रिंगणात; बालाजी खतगावकर भाजपविरोधात लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:10 PM2024-10-21T18:10:00+5:302024-10-21T18:11:47+5:30
Mukhed Vidhansabha Constituency : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी खतगावकर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
Balaji Patil Khatgaonkar : राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या यादीनंतर उमेदवारी न मिळालेल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम केलेले त्यांचे स्वीय सहाय्यक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी स्वीय सचिव बालाजी पाटील खतगावकर यांची अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. नांदेडमधल्या मुखेड मतदारसंघातून बालाजी खतगावकर हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी खतगावकर यांनी मुखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांपासून हालचाली सुरु केल्या होत्या. खतगावकर यांनी मुखेड मतदारसंघामध्ये संपर्क वाढत तिथे कार्यालय सुरू केले होते. ३२ वर्षांहून अधिक काळ शासकीय सेवेत राहिलेल्या खतगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. महायुतीतल्या भाजपने या जागेवर उमेदवार दिल्यानंतर खतगावकर यांनी ही घोषणा केली आहे.
"मुखेड मतदासंघात सर्व्हेमध्ये मी पहिल्या स्थानावर आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावत असतो. त्यांचा निर्णय मान्य करावा लागतो. मुखेडचा विकास हेच माझं एकमेव ध्येय आहे. जनतेच्या प्रतिसादामुळे मी इथपर्यंत आलो आहे. जर आम्ही आता माघार घेतली तर जनता माफ करणार नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाला विरोध न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार मी अपक्ष निवडणुक लढवणार आहे. आता ही लढाई जनतेच्या दरबारात आहे. जनतेने परिवर्तनासाठी साथ दिलीय म्हणून मी समाजसेवेचे व्रत घेऊन काम करणार आहे. जरी आम्हाला संधी मिळाली नाही तरी आमचे विकास कार्य सुरू राहील. पुढील पाच वर्षासाठी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. कोणी कितीही मोठा असू द्या, जनतेला विकत घेऊ शकत नाही," असे बालाजी खतगावकर यांनी म्हटलं आहे.
२०१४ पासून मुखेड मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. मुखेड-कंधार मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांना उमेदवारी दिली आहे. अशातच खतगावकर यांनीही अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. खतगावकर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय सेवानिवृत्त होण्यापूर्वीच घेतला होता. आपण त्यावर ठाम आहोत. पक्षाने तिकिट दिले नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचेही खतगावकर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे आता मखेड मतदारसंघात खतगावकर यांच्यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.