गारठा आणखी वाढणार; फेब्रुवारीत पुन्हा येणार थंडीची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 05:21 PM2017-12-29T17:21:28+5:302017-12-29T17:22:51+5:30
१७ ते २५ डिसेंबर दरम्यान हे पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा धुर्वीय वारे अधिक तीव्र होत असल्याने सकाळी व सायंकाळी बोचर्या थंडीला सामोरे जावे लागत आहे़ अतिथंड वार्यामुळे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कमालीची घट जाणवणार आहे़
नांदेड : उत्तरेकडून वाहणार्या थंड वार्यामुळे विदर्भासह मराठवाडाही गारठला असून नांदेडचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर पोहचले आहे़ या थंडीमुळे नांदेडकरांना दोन दिवसापासून हुडहुडी भरली आहे़
थंडीमुळे गुरूवारी शहरात मुख्य बाजारपेठेतील वर्दळ मंदावल्याचे चित्र होते. सकाळी ११ वाजेपर्यंत थंडीचा जोर कायम रहात असून, दुपारी ३ वाजल्यापासूनच थंडी वाजण्यास पुन्हा सुरूवात होत आहे़ थंडीमुळे शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले़ शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटत असल्याचे दिसत आहेत़
थंडीपासून रक्षणासाठी नागरिक उबदार कपडे परिधान करूनच घराबाहेर पडत आहेत़ मागील दहा दिवसापासून नांदेड परिसरात १० अंशाच्या वर तापमानाची नोंद होत झाली़ मात्र आता १० अंशाहून कमी तापमानाची नोंद होण्यास सुरूवात झाल्यामुळे येत्या तीन, चार, दिवसात ७ ते८ अंश सेल्सिअस तापमान नोंदल्या जाण्याची शक्यता वर्तविली आहे़ त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
बर्फवृष्टीमुळे आली थंडीची लाट
उत्तरे त्यात पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा ध्रुविय वारे जे अतिशय थंड व वेगाने वाहत आहेत़ हे वारे अफगाणिस्तान, पाकिस्तान भागातून भारताच्या वायव्य दिशेने पंजाब, हरियाणा, राजस्थान येथून दाखल होतात़ मात्र गेल्या काही वर्षापासून वरील राज्याच्या दक्षिणेस असलेल्या गुजरात व महाराष्ट्रात दाखल होत आहेत़ या वर्षाच्या शेवटी उत्तर भारतात कश्मिर, लेह, लद्दाक परिसरात वेळेअधिच बर्फवृष्टीला सुरूवात झाली आहे़ अतिशय गारठून टाकणारा चिलाईकलान हा काळ २१ डिसेंबर पासून सुरू होतो़ मात्र यावेळेस तो वेळेआधी सुरू झाल्याचे दिसून येते़
७ अंशावर पारा पोहचण्याची शक्यता
१७ ते २५ डिसेंबर दरम्यान हे पश्चिमी विक्षोपीय वारे अथवा धुर्वीय वारे अधिक तीव्र होत असल्याने सकाळी व सायंकाळी बोचर्या थंडीला सामोरे जावे लागत आहे़ अतिथंड वार्यामुळे २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत कमालीची घट जाणवणार आहे़ नवीन वर्षाच्या स्वागतानंतर पुढील दोन दिवस थंडी कायम राहणार आहे़ मराठवाडा विभागातील अनेक शहरात किमान तापमान १० अंशाच्या खाली घसरणार आहे़ जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तसेच फेब्रुवारीमध्ये हेच तापमान ७ अंशावर किंवा यापेक्षा कमी जाण्याची शक्यता आहे़
- श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएमचे खगोल व अंतराळ, विज्ञान केंद्र