पंचनामे तत्काळ करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:42+5:302021-09-21T04:20:42+5:30
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पंचनाम्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना, विमा कंपनीस शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडे अर्ज सादर केले आहेत. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या साडेचार लाखांच्या घरात असून, आजपर्यंत म्हणजेच मागील दहा दिवसांत केवळ सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले आहेत. या संदर्भात रविवारी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत संबंधितांना पंचनामे वेळेत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात काही ठिकाणी पीक पंचनामे करण्यास अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी विमा प्रतिनिधी यांना त्रास देत दमदाटी होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्याअनुषंगाने असा प्रकार करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी दिले आहेत.
अर्जाची संख्या पाहता पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या प्रतिनिधीबाबत काही तक्रार असल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना रीतसर माहिती द्यावी. जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे वेळेत व विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व शेतकरी व नागरिकांनी विमा कंपनी प्रतिनिधी यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.