वाळूचोरी रोखण्यासाठी आता महसूल, पोलीस विभागाचे संयुक्त भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 07:31 PM2020-02-25T19:31:00+5:302020-02-25T19:32:07+5:30
जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समिती सरसावल
नांदेड : जिल्ह्यात वाळू चोरीचा ऐरणीवर आलेला प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आता संयुक्त पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या पथकामार्फत अवैध रेती उत्खनन व वाहतूक होत असल्यास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीची बैठक २४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. इटणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळूचा उपसा व वाहतूक ही गंभीर बाब असल्याचे सांगत हा प्रकार आता पूर्णत: बंद होणे गरजेचे असल्याचे सांगितले. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबतही आदेशित करण्यात आले. या तक्रार निवारण केंद्रात २४ तास कर्मचारी नियुक्त करावा, असेही सुचित करण्यात आले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये अवैध वाळू उपसा, वाहतूक होत असेल अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामदक्षता समितीस जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला संयुक्त बैठक घेवून त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध रेती वाहतूक व अवैध उपसा यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावयाचा आहे. दुसरीकडे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांचे संयुक्त भरारी पथक गठीत करावे व सदरील पथकामार्फत अवैध रेती उपसा व वाहतूक तात्काळ रोखावी, असेही आदेशित केले आहे. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या अनुषंगाने पोलीस व महसूल विभागाने एकत्रित कारवाई करण्याचेही या बैठकीत निर्देशित करण्यात आले. अवैध रेती वाहतुकीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्यास जप्त केलेली वाहने परिवहन विभागाकडे मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईसाठी द्यावीत. त्या वाहनांची कायद्यानुसार नोंदणी रद्द करावी, असेही स्पष्ट करण्यात आले. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते.
वाळू वाहतूक होणाऱ्या चौकी, नाक्यांची माहिती द्या
च्उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या संयुक्त समिती स्थापन करुन सदरील समितीमार्फत ज्या चौक्या, नाक्यावरुन अवैध वाळू वाहतूक होत आहे अशा रस्त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रत्येक चौकीच्या ठिकाणी महसूल, पोलीस व इतर विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली जाणार आहे. या चौकीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतही निर्देश दिले आहेत.