नांदेडच्या जयभीमनगरात कोम्बिंग आॅपरेशन !; पोलिसांनी वृद्ध, महिला, मुलांनाही बेदम झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 11:31 AM2018-01-04T11:31:34+5:302018-01-04T11:33:01+5:30
शहरातील जनता कॉलनी भागात पोलिसांच्या जीपवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी जयभीमनगर, आंबेडकरनगर, जनता कॉलनी आदी भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविताना महिला, मुले व वृद्धांना बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त नागरिकांनी महात्मा फुले चौकात काही वेळ रास्ता रोकोही केला.
नांदेड : शहरातील जनता कॉलनी भागात पोलिसांच्या जीपवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी जयभीमनगर, आंबेडकरनगर, जनता कॉलनी आदी भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविताना महिला, मुले व वृद्धांना बेदम मारहाण केली. यामुळे संतप्त नागरिकांनी महात्मा फुले चौकात काही वेळ रास्ता रोकोही केला.
बुधवारी दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख साहेबराव नरवाडे हे गस्तीवर असताना त्यांच्या वाहनावर गणेशनगर भागात अचानकपणे दगडफेक केली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही बाब समजताच खुद्द पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना हे मोठ्या फौजफाट्यासह जयभीमनगरात पोहोचले. राज्य राखीव दल, दंगा नियंत्रण पथक यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचा-यांनी जयभीमनगर, आंबेडकरनगर या भागात शोध मोहीम राबविली. यावेळी दहा ते पंधरा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
जलदकृती दलाच्या जवानांनी अक्षरश: दारे लावून बसलेल्या नागरिकांच्या घरात दार तोडून प्रवेश केला. यावेळी पोलिसांच्या मारहाणीत लक्ष्मी सिद्धार्थ जावळे ही महिला जखमी झाली. जयभीमनगरातील पृथ्वीराज रमेश काळे या विद्यार्थ्याला दार तोडून पोलिसांनी मारहाण केली. जयभीमनगरातील संगीता संजय खंडागळे या युवतीच्या घरातही पोलीस शिरले. पोलिसांची दहशत पाहून ही युवती अक्षरश: बेशुद्ध झाली. तिला खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. राष्ट्रपाल रायबोले या युवकालाही घरात शिरुन बेदम मारहाण केली.
हा प्रकार समजताच बहुजन विकास आघाडीचे सुरेश गायकवाड, एन. डी. गवळे, भदंत पंय्याबोधी, रमेश सोनाळे, सुखदेव चिखलीकर आदींनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन पोलिसांची दडपशाही तत्काळ रोखण्याची मागणी केली. त्यानंतर आंबेडकरी संघटनांनी महात्मा फुले चौक आयटीआय येथे रास्ता रोको आंदोलनही केले.