दिलासादायक ! विष्णूपुरीच्या रुग्णालयात लवकरच बायपास सर्जरी विभाग होणार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 04:46 PM2020-11-14T16:46:45+5:302020-11-14T16:48:45+5:30
एक वर्षापूर्वी शासकीय रुग्णालयाच्या वतीने मोडुलर प्लॉन देण्यात आला आहे.
नांदेड : औरंगाबाद वगळता नांदेडचे विष्णुपूरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे अद्ययावत आरोग्य सेवा सुविधा असलेले मराठवाड्यातील एकमेव रुग्णालय आहे. या शासकीय रुग्णालयात लवकरच मल्टीस्पेशालिटी सुविधा सुरु होणार आहेत. बायपास सर्जरी विभाग सुरु विभागासाठी अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
एक वर्षापूर्वी शासकीय रुग्णालयाच्या वतीने मोडुलर प्लॉन देण्यात आला आहे. त्यानंतर आरोग्य मंत्र्यांकडेही सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. आरोग्य मंत्र्यांनीदेखील विशेष लक्ष दिल्याने लवकरच नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील सुपर स्पेशालीटी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या विष्णुपूरीच्या शासकीय रुग्णालयात मल्टी सुपर स्पेशालिटीनुसार १३ मॉडुलर सर्जरी विभाग (ओटी) बांधून तयार आहेत. मात्र, त्यापैकी सहा ते सात सर्जरी विभाग सुरु आहेत. इतर सर्जरी विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात हृयाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या सर्जरी, न्युरो व युरो (किडनी व ब्रेन) सर्जरी विभाग सुरु झाल्यास गोरगरीब रुग्णांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.
हा विभाग सुरु झाल्यास नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, लातूर, बीड, उस्मानाबादसह नांदेड जिल्ह्याच्या सीमाभागास लागून असलेल्यास तेलंगणा व कर्नाटक राज्यातील रुग्णांनादेखील दिलासा मिळणार आहे.अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख हे कार्डियाक युनिट, कार्डियालॉजिस्ट कॅथलॅब सुरु करण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहेत. एखाद्या रुग्णास खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करायची झाल्यास त्यासाठी किमान दीड ते दोन लाखांच्या पुढे खर्च येतो. त्यामुळे अनेक रुग्णांच्या खिशाला हा खर्च परडवणारा नसतो. मात्र, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हा विभाग झाल्यास त्याचा गरजूवंतांना चांगला फायदा होणार आहे.
विभाग कार्यान्वित करण्याच्या हालचाली
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आरोग्य सुविधा आहेत. परंतु, हृदयाच्या सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या सर्जरी, न्यूरो व युरो (किडनी व ब्रेन) सर्जरी विभाग तेवढा नाही. म्हणून, कॅथलॅब सुरु करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे लवकरच हा विभाग प्रत्यक्षात येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांनी दिली.