दिलासादायक ! नांदेडचा कोरोना मृत्युदर ७.२ टक्क्यांवरून आला ३.५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 01:22 PM2020-08-10T13:22:22+5:302020-08-10T13:25:34+5:30

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे.

Comfortable! Nanded's corona mortality rate has come down from 7.2 per cent to 3.5 per cent | दिलासादायक ! नांदेडचा कोरोना मृत्युदर ७.२ टक्क्यांवरून आला ३.५ वर

दिलासादायक ! नांदेडचा कोरोना मृत्युदर ७.२ टक्क्यांवरून आला ३.५ वर

Next
ठळक मुद्देजिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या ३ हजारापेक्षा अधिक आतापर्यंत १ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्ततर आतापर्यंत एकूण १२० मृत्यू झाले आहेत

नांदेड : नांदेडचा कोरोना मृत्युदर मे महिन्यात  ७.२ टक्क्यांवर पोहोचला होता. तो ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात घसरून ३.५ टक्क्यांवर पोहचला असल्याने दिलासादायक चित्र आहे. जिल्ह्यात सर्वात कमी मृत्युदर जूनमध्ये ३.४ टक्के इतका होता. कोरोना रुग्णांची संख्या जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज शतकपारच आहे. ३ ऑगस्टला हा आकडा २०३ वरही पोहचला होता. जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता ३ हजारापेक्षा अधिक झाली आहे. त्याचवेळी मध्यंतरी वाढलेला मृत्युदर ही चिंतेची बाब होती. एकाच दिवशी ११ बळीही नांदेडमध्ये गेले होते. त्यानंतर हा मृत्युदर कमी करण्यासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात विविध उपाययोजना करण्यात आल्या. या उपाययोजनांना काहीअंशी यशही आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ देशमुख यांच्या प्रयत्नातून हा मृत्युदर कमी करण्यात यश येत आहे.  मे महिन्यामध्ये तर नांदेड जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा ७.२ टक्के इतका होता. जूनमध्ये तो ३.४ टक्क्यांवर आला. जुलैमध्ये या मृत्युदरात वाढ होऊन ४.४ टक्क्यांवर मृत्युदर पोहचला होता. ऑगस्टमध्ये आता तो घसरून ३.५ टक्के इतका झाला आहे.

जिल्ह्यातील १ हजार ६३२ रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात एकूण ३ हजार २९७ रुग्णसंख्या जिल्ह्यात आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आतपर्यंत १ हजार ६३२ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी दिली आहे. तर आतापर्यंत एकूण १२० मृत्यू झाले आहेत. ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २१७ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. यात सर्वाधिक रुग्ण हे नांदेडमधील पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील होते. त्यापाठोपाठ मुखेडमध्ये २८, हदगाव-२७, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १९, किनवट- १०, उमरी-१४, मुदखेड कोविड केअर सेंटरमधून १० रुग्णांना सुट्टी देण्यात आली होती.

मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात शंभराहून अधिक येत आहे. ही रुग्णसंख्या वाढण्याचे कारण म्हणजे जिल्ह्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. अ‍ॅन्टीजन तपासण्यासह आरटीपीसीआर चाचण्याही केल्या जात आहेत. जिल्ह्यात आजघडीला प्रतिदिन ३ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यातून १०० ते १५० रुग्ण सापडत आहेत. रुग्णसंख्या वाढती असली तरीही त्यांना शोधून योग्य उपचार दिले जात आहेत. मृत्यूदर कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी सांगितले.

Web Title: Comfortable! Nanded's corona mortality rate has come down from 7.2 per cent to 3.5 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.