मुलभूत सुविधांच्या कामावर समिती नाराज
By admin | Published: January 30, 2015 02:35 PM2015-01-30T14:35:28+5:302015-01-30T14:35:28+5:30
केंद्रीय समितीच्या पथकाने सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली.
नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत शहरात बांधलेले घरकुले व मुलभूत सुविधांच्या कामाची पाहणी गुरूवारी केंद्रीय समितीच्या पथकाने केली. यावेळी सर्वाधिक घरकुले बांधल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच मुलभूत सुविधांची कामे मात्र दज्रेदार नसल्यामुळे समितीने नाराजी व्यक्त केली.
झोपडपट्टी मुक्त शहराच्या निर्मितीसाठी गोरगरिबांना राहण्यासाठी पक्के घरे देण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरातील १६८ भागात राबविण्यात येत आहे. मागील सहा वर्षापासून ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी राबविली जात आहे. ही योजना अंतिम टप्यात आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने या कामांची पाहणी करण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण प्रकाश व डॉ. रायना यांचे पथक शहरात आले होते. गुरूवारी या पथकाने गौतमनगर, सांगवी व श्रावस्तीनगर या भागातील घरकुलांची पाहणी केली. त्यानंतर शहरातील इतर ठिकाणी मुलभूत सुविधांच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर लाभार्थी, नगरसेवक, अधिकारी व पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला.
प्रकाश यांनी सांगितले. की, महापालिकेने ही योजना राबविण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले. त्यामुळेच सर्वाधिक घरकुले ते बांधू शकले. मात्र दुसरीकडे मुलभूत सुविधांची कामे समाधानकारकरित्या झाली नाहीत. या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या जनजागृतीची गरज आहे. ड्रेनेजलाईनची कामे चुकीचे झाली आहेत. योग्य जोडण्या न झाल्यामुळे समस्या वाढणार आहेत. त्याशिवाय सिमेंट रस्ते दबले आहेत. पाणीपुरवठय़ाची कामेही योग्यरित्या झालेले नाहीत. परिणामी रहिवाशांना पाणी मिळत नाही.
ही योजना जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत असल्यामुळे झालेल्या विकासकामांची देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी महापालिकेची आहे. लोकसहभागही महत्वाचा आहे. लोकांना या योजनेबद्दल योग्य माहिती देऊन यापुढे आपला परिसर व आपले घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
या योजनेतंर्गत ९0 टक्के काम पूर्ण झाले असून १0 टक्के मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. फेब्रुवारीत नवीन घरकुल योजना येत असल्याचे गृहनिर्माण प्रकल्प समन्वयक बाळकृष्ण प्रकाश यांनी सांगितले. /(प्रतिनिधी)
लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले. घरकुलांच्या परिसरात अस्वच्छता आढळून आली. गौतमनगर भागातील काही इमारतीतील सुविधांची दुरवस्था झाली असून त्या ठिकाणी देखभालीची गरज आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या परिसरातील सुविधांचे रक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने लाभार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत समितीने व्यक्त केले.
जनजागृतीची गरज
■ राजीव गांधी आवास योजनेचे नाव बदलून नवीन घरकुल योजना फेब्रुवारीपासून राबविण्याचा मानस केंद्र शासनाचा आहे. त्यामुळे बीएसयुपी योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बीएसयुपी योजनेतील अर्धवट कामेही या नवीन घरकुल योजनेत समाविष्ट होणार असल्याचे पथकाने सांगितले.