नांदेड जिल्हा परिषदेच्या अधिका-यांच्या नियोजनावर समिती सदस्य नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:32 AM2018-01-17T00:32:30+5:302018-01-17T00:33:30+5:30
जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करताना अधिकारी, विभागप्रमुख नियोजन समिती सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ यावेळी सदस्यांनी विविध कामे सुचविली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करताना अधिकारी, विभागप्रमुख नियोजन समिती सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ यावेळी सदस्यांनी विविध कामे सुचविली़
जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ च्या प्रारुप आराखड्याची छाननी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या लहान गटाची बैठक आ़नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली़
यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा नियोजन समिती सदस्या शैलजा स्वामी, डॉ. अशोक बेलखेडे, बबन बारसे, संजय बेळगे आदी सदस्य व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते़
या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना व अनुसूचित जाती उपयोजना, अनुसूचित जमाती उपयोजना प्रारुप आराखड्याच्या छाननीसंदर्भात तसेच अद्ययावत २०१७-१८ मध्ये खर्च झालेला निधी व २०१८-१९ मध्ये प्रस्तावित कामे यासंदर्भात आ़ पाटील यांनी आढावा घेतला. विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जुन्या विहिरीची दुरूस्ती करून विहिरीचे पुनर्भरण करण्याची मागणी डॉ़ बेलखोडे यांनी यावेळी केली़
जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बेळगे यांनी ग्रामीण भागातील प्रश्न मांडले़ ग्रामपंचायतीला अधिकचा निधी उपलब्ध करून देणे तसेच पंजाबराव देशमुख कर्ज व्याज सवलत योजनेसंदर्भात जनजागृती करणे, रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून रोहित्र उपलब्धतेसाठी अधिक निधी देणे आदी मागण्या केल्या़