स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 04:52 PM2020-11-20T16:52:42+5:302020-11-20T16:55:06+5:30
आगोदरच कोरोनामुळे अनेकज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळण्यास विलंब होत असल्याने पालक आणि विद्यार्थी हतबल झाल्यचे चित्र आहे.
नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या युपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल लागून महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पुणे येथील बार्टी संस्थेच्यावतीने देण्यात येणारी ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नसल्याने ही परीक्षा देणारे विद्यार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली. याच महिन्यात १९ ऑक्टोबर रोजी परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात येवून मुख्य परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली.या पात्र ठरलेल्या मुलांना परीक्षेची तयारी करणाऱ्या बार्टी संस्थेच्यावतीने निवास व उपयुक्त पुस्तकांसाठी शिष्यवृत्ती म्हणून ५० हजार रुपये देण्यात येतात. मात्र महिना भराच कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यामुळे पुणे, मुंबई, दिल्लीसह अन्य शहरात जावून मुख्य परीक्षेची तयारी करणे, टेस्ट सिरीज लावणे, लेखण सराव, शिकवणी लावणे याबरोबरच निवास व्यवस्था करण्यासाठीही विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. युपीएससी परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढावा यासाठी ही योजना राबविण्यात येते. मात्र घोषणा करुनही अंमलबजावणी केली जात नसल्याने मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक हेळसांड होत आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित देण्याची मागणही करण्यात आली आहे.
कोरोनामुळे ‘यशदा’नेही निवास व्यवस्था नाकारली
आगोदरच कोरोनामुळे अनेकज आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यातच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळण्यास विलंब होत असल्याने पालक आणि विद्यार्थी हतबल झाल्यचे चित्र आहे. दुसरीकडे मुख्य परीक्षेची पुणे यशदा येथे तयारी करणाऱ्या मुलांना कोरोनाचे कारण पुढे करुन निवास व्यवस्था नाकारण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे मुलांच्या मानसिकेतवर विपरित परिणाम होवून याचा फटका मुख्य परीक्षेच्या निकालात बसू शकतो. शासनाने या संदर्भात तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी म्हटले आहे.