मराठवाड्यात तक्रारी जास्त,कारण लोकांना कामधंदे नाहीत;तहसीलदारांचे मंत्र्यासमोर वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 04:37 PM2022-05-06T16:37:50+5:302022-05-06T16:49:44+5:30
''मराठवाड्यात परिस्थिती थोडी बिकट आहे. इथे लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या फार वाढली आहे''.
नांदेड: मराठवाड्यातील लोकांना काम नसल्याने ते जास्त तक्रारी करतात, त्यामुळे येथे अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे प्रमाण जास्त असल्याचा अजब दावा नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तहसीलदार अंबेकर यांनी हा दावा थेट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्यासमोर केला आहे. या वादग्रस्त वक्तव्याची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर असून भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
औरंगाबाद विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन समारंभात तहसीलदार किरण अंबेकर यांनी हे वक्तव्य केल. गेल्या अनेक वर्षांपासून अंबेकर नांदेडमध्येच कार्यरत असून तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष आहेत. तहसीलदार अंबेकर यांचे भर सभेतील हे वादग्रस्त वक्तव्य चांगलच चर्चेत आले आहे. सभेत हसत हसत ते म्हणाले, साहेबांनी मला विचारलं की मराठवाड्यात विभागीय चौकशांचे प्रमाण फार जास्त आहे. ते कशामुळे जास्त आहे. तर मी सांगितलं, मराठवाड्यात परिस्थिती थोडी बिकट आहे. इथे लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या मराठवाड्यात फार वाढली आहे. त्यामुळे या तक्रारी होत आहेत. यात कोणत्याही पद्धतीचे आरोप केले जातात, तसेच यातले काही आरोप सत्यही असतात, अशी कबुलीही अंबेकर यांनी यावेळी दिली.
जास्त अभ्यास केल्यानंतर कुणाला दोषी पकडायचं असेल आणि जबाबदार धरायचं असेल तर विभागाच्या जीआरमध्ये तहसिलदाराचे नाव हे शंभर टक्के टाकलं जातंय. यामुळे महसूल विभागावर ताण पडतो. याबाबत यापूर्वीही मागणी केली आहे की, साहेब आपल्या परवानगीशिवाय इतर विभागांनी असे जीआर काढू नये, असेही महसूल मंत्री थोरातांना उद्देशून ते म्हणाले. मात्र, बोलण्याच्या ओघात मराठवाड्यातील लोकांना काम नसतं, म्हणून तक्रारी करता, असे वक्तव्य अंबेकर यांनी केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. सोशल मिडीयावर काहींनी याचा निषेध करत महसूल अधिकाऱ्यांवरील तक्रारी, त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे याचा पाढा वाचला आहे.