लॉकडाऊनच्या काळात वाढल्या अनेकांच्या गुडघादुखीच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:15+5:302020-12-11T04:44:15+5:30
नांदेड- मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे नागरिकांना घरातच बसावे लागले. त्यामुळे अनेकांना गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यातच ...
नांदेड- मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे नागरिकांना घरातच बसावे लागले. त्यामुळे अनेकांना गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यातच आता चिकनगुनियाची साथ आल्याने नागरिक गुडघेदुखीने त्रस्त झाले आहेत.
कोरोना महामारीमुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. सतत घरात बसून राहिल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरातच बसण्याची वेळ आली. त्यातच घराबाहेर पडावे तर कोरोनाची भीती समोर होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पाय मोकळे करण्याची संधीच मिळाली नाही. या कारणामुळे आता अनेक ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. असे असले तरी मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे अनेक आजारांकडे दुर्लक्ष झाले. कोरोना हा एकमेव आजार समोर असल्याने नागरिकांनी इतर आजारांना मनावर घेतले नाही. त्यातच आता चिकनगुनिया या आजाराने डोके वर काढले असून चिकनगुनियाचे रूग्ण वाढल्याची माहिती डाॅ. प्रमोद अंबाळकर यांनी दिली. सध्या चिकनगुनियाचे रूग्ण अधिक आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक रूग्ण
कोरोनापाठोपाठ सध्या चिकनगुनियासारखे आजार निर्माण झाल्याने अनेकांना गुडघेदुखीचा सामना करावा लागत आहे. मागील काळात नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे पायी चालण्याची सवय मोडली. सकाळी फिरण्यावरही निर्बंध आले. त्यामुळे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासमोर ही समस्या उभी राहिली आहे. येथील शासकीय रूग्णालयात गतवर्षी ३०० रूग्णांची ओपीडी होती, आता मात्र गुडघेदुखीचे रूग्ण ७०० हून अधिक असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
गुडघादुखीची अशी घ्यावी काळजी
गुडघेदुखी अधिक जाणवू लागल्यावर रूग्णांनी डाॅक्टरांकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांनी विश्रांती घ्यावी, जमिनीवर मांडी घालून किंवा पाय मुडपून बसू नये, विशेषत: खुर्चीवर बसावे, पायाचा विशिष्ठ व्यायाम करावा. व्यक्तीचे वय लहान असताना अपघात होणे, संधीवात होणे, युरिक ॲसिड वाढलेले असणे, सोरायटीक ॲथ्रायटीस असणे या कारणामुळे गुडघेदुखी होऊ शकते. पण गुडघा झिजल्यानतर झालेली गुडघेदुखी साधारणपणे वयाच्या साठीनंतरच डोके वर काढते.