महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची मनपाकडून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:06 AM2019-05-08T01:06:13+5:302019-05-08T01:06:32+5:30
जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज परिवर्तनाचे व्यापक काम केले. त्यांनी सामाजिक समतेचा जगाला संदेश दिला. नांदेड शहरात त्यांच्या पुतळा निर्मितीचे अभिवचन काँग्रेसने दिले होते़
नांदेड : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाज परिवर्तनाचे व्यापक काम केले. त्यांनी सामाजिक समतेचा जगाला संदेश दिला. नांदेड शहरात त्यांच्या पुतळा निर्मितीचे अभिवचन काँग्रेसने दिले होते़ त्यादृष्टीने महापालिकेच्या पातळीवरील सर्व मान्यतेच्या व जागा उपलब्धतेच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत़ परंतु शासनस्तरावर मान्यता रखडल्यामुळेच पुतळा बसविण्याचे काम प्रलंबित आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी केले.
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर व भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी सभापती माधवराव पांडागळे होते. तर आ. डी. पी. सावंत, महापौर शीलाताई भवरे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर विनय गिरडे पाटील, शैलजा स्वामी, मेळाव्याचे संयोजक संतोष पांडागळे, संजय बेळगे, बालाजीराव पांडागळे यांच्यासह राजू शेट्टे, दिलीप डांगे, कैलास जाकापुरे, सुभाषअप्पा सराफ, पंडित लंगडे, विनोद कांचनगिरे, हरिहर पाटील कुरुळेकर, रितेश बुरांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खा.चव्हाण म्हणाले, महात्मा बसवेश्वर यांनी समानतेची शिकवण दिली. सामाजिक समतेची बीजे रोवली. संत बसवेश्वरांच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने देशाला गरज आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या विचारश्रेणीवर चालण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. समाजातील सर्व समाजघटकांना सोबत घेवून त्यांना मूलभूत गरजा पुरविल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही, असे सांगतानाच कोणत्याही कामात राजकारण करणे योग्य नव्हे़ शहरातील बसेवश्वर पुतळा उभारणीची मनपास्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे़ परंतु, शासनस्तरावर मान्यता न मिळाल्याने पुढील काम रखडले आहे. असे असतानासुद्धा काही मंडळी यातही राजकारण करुन याचे खापर काँग्रेस पक्षावर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. शासनाकडून मान्यता येताच शहरात बसवेश्वरांचा पुतळा बसविण्यात येईल,असे खा.चव्हाण यांनी सांगितले़
अध्यक्षीय समारोपात माधवराव पांडागळे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पांडागळे यांनी केले.