पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:57 PM2019-05-19T23:57:47+5:302019-05-19T23:58:32+5:30
जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़
नांदेड : जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़
प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज मुखेड तालुक्यातील मोटरगा, चांडोळा, भगनूरवाडी तसेच आसना नदी व विष्णूपुरी प्रकल्पाची पाहणी केली़ त्यानंतर त्यांनी दुपारी ४़३० वाजता जिल्हाधिकारी यांच्या कक्षात पत्रकारांशी संवाद साधला़ जिल्ह्यात दुष्काळ दूर करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी जलसंधारण व रोजगार हमीची कामे हाती घेण्यात आली आहेत़ ग्रामीण भागातील पाणीटंचाई भीषण बनली असून उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे़
सध्या १२१ टँकर जिल्ह्यात सुरू असून सर्वाधिक ५१ टँकर मुखेड व लोहा तालुक्यात २३ टँकर सुरू आहेत़ ८७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून नवीन ५०७ विंधन विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे़ तात्पुरता पाणीपुरवठा योजनेची ६३ कामे हाती घेण्यात आली असून १९३ नळयोजना दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत़ एकूण ६८़२१ कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे़
जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी व गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार हमीची १०२१ कामे सुरू करण्यात आली आहेत़ त्यावर १३८६० मजूर काम करत आहेत़ दुष्काळ परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेच्या आदेशात काही बदल करण्यात आले आहेत़ यापूर्वी जलसंधारणावरील रोजगार हमीच्या कामांना तहसील कार्यालय प्रशासकीय मान्यता देण्यात येत होती़ मात्र आता कृषी विभागातच या कामांना मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहेत़
जिल्ह्यात पशूधन मोठ्या प्रमाणात असले तरी चारा टंचाईचा प्रश्न म्हणावा तेवढा गंभीर नाही़ त्यामुळे केवळ एक-दोन ठिकाणी चारा छावणीचे प्रस्ताव आले आहेत़ छावणीच्या रुपात जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे आले पाहिजे, असेही डवले यांनी आवाहन केले़ दरम्यान, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना, शेतकरीपुत्र तसेच लोकप्रतिनिधींनी भेट घेवून त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले़
नांदेड शहरातील पाणीटंचाई गंभीर
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात अत्यल्प साठा राहिल्यामुळे जुलै अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी प्रशासनाला कडक धोरण राबवावे लागणार आहे़
सध्या विष्णुपूरी प्रकल्पात १५ जूनपर्यंत पुरेल एवढा साठा आहे़ त्यासाठी महापालिकेने हे पाणी काटकसरीने पुरवठा करण्याची गरज असल्याचे एकनाथ डवले यांनी सांगितले़