नांदेडात बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:07 AM2018-01-26T00:07:26+5:302018-01-26T00:08:14+5:30
‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी नांदेड शहरात गुरूवारी पुकारलेल्या बंदला दक्षिण नांदेड भागात उस्फुर्त तर अन्य भागात समिश्र मिळाला़ दरम्यान, दक्षिण नांदेडात येणा-या कौठा भागात बसवर झालेल्या दगडफेकीत एसटीचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ‘पद्मावत’ चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी नांदेड शहरात गुरूवारी पुकारलेल्या बंदला दक्षिण नांदेड भागात उस्फुर्त तर अन्य भागात समिश्र मिळाला़ दरम्यान, दक्षिण नांदेडात येणा-या कौठा भागात बसवर झालेल्या दगडफेकीत एसटीचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले़
राणी पद्मावतीने केलेल्या अग्नी जौहरचा राजपुत समाजात विशेष सन्मानाने उल्लेख केला जातो़ परंतु, राजपुत समाजाचा गौरवशाली इतिहासावर केवळ मनोजरंजनाच्या उद्देशाने चित्रपट काढून समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेक राजपुत संघटनांनी केला आहे़ पद्मावतच्या विरोधात मंगळवारी राजपुत संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता़
राजपूत संघर्ष समिती आणि शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी गुरूवारी नांदेड शहर बंदची हाक दिली होती़ यास शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला़ दक्षिण नांदेड भागातील गाडीपुरा, जुना मोंढा, वजिराबाद भागातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद होती़ तर अन्य भागात दुपारनंतर व्यापा-यांनी प्रतिष्ठाने उघडली़ गाडीपु-यातील श्री रेणुका माता मंदिर परिसरात एकत्र आलेल्या शेकडो राजपूत समाजबांधवांनी ‘पद्मावत’ चित्रपटाचे निर्माते भन्साळी विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन निषेध नोंदविला.
नांदेड शहर बंदला कौठा भागात बसवर झालेल्या दगडफेकीने गालबोट लागले़ या परिसरात एमएच २० बीसी १९६६ या क्रमांकाच्या बसवर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अचानक येऊन दगडफेक करीत बस जाळण्याचा प्रयत्न केला़ यामध्ये सदर बसचे जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान झाले असून कोणतीही जिवितहाणी झाली नसल्याचे नांदेड बसस्थानक प्रमुख एऩ एस़ निम्मनवाड यांनी सांगितले़ याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ बंद दरम्यान शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाच्या पार्श्वभूमिवर मागील दोन दिवसांपासून पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील ई-स्क्वेअर, पीव्हीआर या सिनेमागृहात बुधवारी सायंकाळीच मोठ्या पोलीस बंदोबस्तात ‘पद्मावत’ प्रदर्शित झाला. चित्रपटगृह परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर जवळपास ९०० जणांनी पहिल्याच दिवशी हा चित्रपटगृहात हजेरी लावली. तर गुरूवारीदेखील मोठ्या बंदोबस्तात सिनेमाचे सर्व शो झाले असून वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येत हजेरी लावत असल्याचे चित्र गुरुवारी पहायला मिळाले.