शिवसैनिकांना प्रवेश, काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, पोलिसांकडून पक्षपातीपणा झाल्याचा काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 08:13 PM2017-10-08T20:13:19+5:302017-10-08T20:13:40+5:30
विमानतळावर रविवारी सायंकाळी नेत्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची ही भूमिका पक्षपाती असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
नांदेड - विमानतळावर रविवारी सायंकाळी नेत्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवून पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांची ही भूमिका पक्षपाती असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध करीत पक्षपाती भूमिका घेणा-या पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी हैदराबाद नांदेड विमानाने देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व शिवसेना कार्याध्यक्ष हे नांदेड विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी नांदेड विमानतळावर आले होते.
पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विमानतळात प्रवेश दिला तर काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारत लाठीचार्ज केला. यात नांदेड लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू कोंडेकर यांच्यासह त्यांचे सहकारी किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या या पक्षपाती कारवाईविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कारवाईची मागणी केली आहे.