नांदेडवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

By admin | Published: March 21, 2017 06:42 PM2017-03-21T18:42:59+5:302017-03-21T18:42:59+5:30

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीची घडी नांदेडमधून सुरू झाली, अन् पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम

Congress flag again in Nanded | नांदेडवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

नांदेडवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा

Next

धर्मराज हल्लाळे /ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. 21 -  काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आघाडीची घडी नांदेडमधून सुरू झाली, अन् पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. बदलत्या परिस्थितीतही जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या जागा वाढलेल्या नांदेडने सातत्याने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. 
नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीकडे सर्वांचेच लक्ष होते. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपद सुटल्याने प्रत्येक पक्षात तुल्यबळ दावेदार सांगितले जात होते. प्रचारादरम्यान आघाडीत बिघाडी झाली, युतीही तुटली. त्यामुळे निकालानंतर कोण कोणासोबत जाणार याचे तर्कवितर्क लढविले गेले. जिल्हा बँकेत काँग्रेसविरुद्ध सर्व असे चित्र होते. त्याची आठवण करून दिली जात होती. परंतु माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २५ वरून २८ जागांवर मजल मारली. सर्वत्र सत्ता परिवर्तन तसेच केंद्र व राज्यातील सत्तेच्या बाजूने कौल मिळत असतानाही नांदेडच्या जनतेने मात्र काँग्रेसची साथ जिल्हा परिषद निवडणुकीतही सोडली नाही. जिल्ह्यात ११ नगराध्यक्ष काँग्रेसचे आहेत़ विधानपरिषदेचा निकालही ताजाच होता. यासर्व पार्श्वभूमीवर विरोधकांना रान पेटवूनही यशाच्या जवळ जाता आले नाही. निकालानंतर काँग्रेस २८, राष्ट्रवादी १०, भाजपा १३, शिवसेना १०, रासप १ व अपक्ष एक असे संख्याबळ समोर आले. राज्यपातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडीची भूमिका घेतली. त्याची सुरुवात नांदेडमधून झाली. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांना भेटलेल्या भाजपा सेना नेत्यांना अनुकूल शब्द मिळाला नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आ. प्रदीप नाईक व माजी आ. शंकर अण्णा धोंडगे या दोघांनीही समविचारी पक्षाबरोबर जाण्याचा म्हणजेच काँग्रेसला साथ देण्याचा सूर प्रारंभापासून लावला होता. माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांचेही पक्षातील नेत्यांनी मन वळविले. माजी मुख्यमंत्री चव्हाण व पक्षनिरीक्षक आ. सतीश चव्हाण यांनी आघाडीची घोषणा केली. त्यामुळे बहुमताचा आकडा ओलांडला. त्यात रासपा व एका अपक्ष उमेदवाराची भर पडल्याने सत्ताधारी आघाडीकडे ६३ पैकी ४० असे भक्कम संख्याबळ झाले. 
नगरपालिका निवडणुक यशापाठोपाठ जिल्हा परिषदेवरील आपली सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेसची पकड आणखी मजबूत झाली आहे. माजी आ. जवळगावकर यांच्या मातोश्री शांताबाई पवार जवळगावकर यांना अध्यक्षपद देवून जिल्हा परिषदेचा कारभार अनुभवी खांद्यावर टाकला आहे. त्याचवेळी आ. नाईक यांच्या स्पष्ट भूमिकेला साथ मिळाल्याने उपाध्यक्षपदी समाधान जाधव विराजमान झाले आहेत.

Web Title: Congress flag again in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.