नांदेड उत्तरमध्ये काँग्रेस पाठोपाठ उद्धव सेनेचाही उमेदवार; आघाडीसोबत महायुतीलाही टेन्शन
By श्रीनिवास भोसले | Published: October 29, 2024 03:07 PM2024-10-29T15:07:34+5:302024-10-29T15:19:00+5:30
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघापैकी सर्वात शेवटी नांदेड उत्तर विधानसभेचा उमेदवार काँग्रेसने जाहीर केला.
नांदेड : जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या महाविकास आघाडीतील गोंधळ अद्याप संपलेला नाही. या ठिकाणी काँग्रेसकडून अब्दूल सत्तार यांना उमेदवारी दिल्यानंतर आता उद्धव सेनेकडून अपक्ष उमेदवार संगीता डक पाटील यांना उद्धव सेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्धव सेना विरूद्ध शिंदे सेना असा सामना हाेण्याची दाट शक्यता आहे. परिणामी शिंदे सेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांचे टेन्शन वाढले आहे.
नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदार संघापैकी सर्वात शेवटी नांदेड उत्तर विधानसभेचा उमेदवार काँग्रेसने जाहीर केला. या मतदार संघात विद्यमान आमदार शिवसेनेचे असून त्यांनी शिंदे सेनेची घरोबा केला आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात रान पेटविले आहे. दरम्यान, सदर जागेवरून वाद निर्माण झाल्याने ही जागा 'मातोश्री'ने काँग्रेसला सोडली आणि त्या बदल्यात हिंगोलीची जागा घेतली. परंतु, नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला. तसेच सोशल मिडियावर जाहीररित्या टिकाटिप्पणी केली. तद्नंतर आता उद्धव सेनेने याठिकाणी अपक्ष उमेदवार संगीता डक पाटील यांना एबी फॉर्म दिला असून त्यांनी अधिकृतरित्या आपली उमेदवारी दाखल केली. आता नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस उमेदवारासह शिंदे सेेनेच्या उमेदवाराचेही टेन्शन वाढले आहे. दरम्यान, आघाडीमध्ये सदर जागा काँग्रेसला दिल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एबी फाॅर्म डक यांना कसा दिला गेला, याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू, असे उद्धव सेनेेचे नेते विनायक राऊत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कहीं खुशी कंही गम...
संगीता पाटील डक यांच्या उमेदवारीवरून आता उद्धव सेनेतही दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे. जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या घरी काही शिवसैनिकांनी बैठक घेवून नाराजी व्यक्त केली तर अनेकांनी सोशल मिडियावर उद्धव सेनेने शिंदे सेनेच्या विरोधात उमेदवार दिल्याने स्वागत केले आहे.
लोहा मतदार संघामध्येही आघाडीचे दोन उमेदवार
लोहा विधानसभा मतदार संघात देखील आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या ठिकाणी शेकापकडून विद्यमान आमदार शामसुंदर शिंदे यांना तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.