काँग्रेस-राष्ट्रवादीची आज संयुक्त सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:44 AM2019-02-20T00:44:32+5:302019-02-20T00:45:24+5:30
शहरातील इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी ५ वाजता संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे़
नांदेड : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या प्रचाराचा प्रारंभ बुधवारी नांदेड येथून होत आहे़ यानिमित्ताने काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर सायंकाळी ५ वाजता संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे़ या सभेला मोठी उपस्थिती लावण्याचे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केले आहे़
या संयुक्त सभेला माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी खा़राजीव सातव, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आ़ जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री आ़ अब्दुल्ल सत्तार, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर, जयप्रकाश दांडेगावकर, आ़ डी़ पी़ सावंत यांची उपस्थिती राहणार आहे़ शहरातील १२ एकरच्या इंदिरा गांधी मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे़ सभेला जवळपास ३० हजारांचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा विश्वास महानगराध्यक्ष आ़ अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केला आहे़
पद्मश्री कदम यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री श्यामराव कदम यांचा जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालय प्रांगणात अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे़ या पुतळ्याचेही २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खा़ शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे़ अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण राहणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनकर दहीफळे, उपाध्यक्ष डॉ़सुनील कदम यांनी दिली़