नांदेड-लातूरला थेट रेल्वेमार्गाने जोडा, निम्मा खर्च राज्य शासन उचलेल : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 07:32 PM2021-12-17T19:32:04+5:302021-12-17T19:33:41+5:30
Ashok Chavhan on Nanded - Latur Railway : या दोन्ही शहरांना सरळ रेषेत जोडणारा रेल्वे मार्ग टाकल्यास त्याचे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असेल.
नायगाव(नांदेड) : मराठवाड्यातील ( Marathawada ) प्रमुख शहरे नांदेड व लातूरलारेल्वे मार्गाने थेट जोडण्याची (Connect Nanded-Latur directly by rail ) मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी केली आहे. तसेच यासाठी राज्य शासन निम्मा खर्च उचलण्यास तयार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. ते नायगाव येथे नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.
या नवीन व रेल्वे मार्गाची आवश्यकता विषद करताना मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, लातूर-नांदेड मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात दळणवळण आहे. रस्ते मार्गाने हे अंतर सुमारे १४४ किलोमीटर आहे. तर पूर्णा, परभणी, परळी, लातूर रोड मार्गे रेल्वे मार्गाने हे अंतर २१२ किलोमीटर आहे. या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना हा प्रवास पूर्ण करण्यासाठी साधारणतः सहा तासांचा कालावधी लागतो. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतूक स्वस्त व वेगवान असल्याने नांदेड व लातूर दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प मंजूर करण्याची गरज आहे. या दोन्ही शहरांना सरळ रेषेत जोडणारा रेल्वे मार्ग टाकल्यास त्याचे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असेल. त्यामुळे ताशी किमान १०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे जेमतेम सव्वा तासांत नांदेडहून लातूरला पोहचू शकेल. या रेल्वे मार्गामुळे नांदेड ते पुण्यामधील रेल्वे अंतर देखील कमी होऊन प्रवाशांचा तसेच मालवाहतुकीचा वेळ आणि पैसा वाचू शकेल, असेही चव्हाण म्हणाले.
'नांदेड-लातूर' रेल्वेचा निम्मा खर्च राज्यशासन करेल
केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिल्यास ५० टक्के खर्च उचलण्याची राज्य शासनाची तयारी असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. या रेल्वे मार्गामुळे नांदेड, लातूर तसेच परभणी जिल्ह्यातील अर्थकारणाला अधिक गती मिळणार असल्याने या प्रकल्पासाठी सर्व राजकीय पक्षांनी, केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने काम केले पाहिजे, असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.