मंत्रालयात बसून नांदेडविरुद्ध षड्यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:31 AM2018-10-27T00:31:00+5:302018-10-27T00:32:35+5:30

या षड्यंत्रात सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील चमच्यांचा सहभाग असल्याचा घणाघाती आरोप करीत नांदेडचे हाल करु नका. समोरासमोर लढण्यावर आमचा विश्वास आहे. हिंमत असेल तर थेट सामना करा

Conspiracy against Nanded by sitting in Mantralaya | मंत्रालयात बसून नांदेडविरुद्ध षड्यंत्र

मंत्रालयात बसून नांदेडविरुद्ध षड्यंत्र

Next
ठळक मुद्देहिंमत असेल तर थेट लढाअशोक चव्हाण यांचे विरोधकांना आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेडकर कायम काँग्रेस आणि चव्हाण परिवाराच्या पाठीशी राहिलेले आहेत. ही बाब विरोधकांना खुपते आहे. त्यामुळेच नांदेडकरांची कोंडी करुन शहराला अधोगतीकडे नेण्याचे काम मागील चार वर्षांपासून सुरु आहे. आता नांदेडवासियांना पिण्याचे पाणीही मिळू नये, याचे षड्यंत्र मंत्रालयात बसून रचले जात आहे. या षड्यंत्रात सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील चमच्यांचा सहभाग असल्याचा घणाघाती आरोप करीत नांदेडचे हाल करु नका. समोरासमोर लढण्यावर आमचा विश्वास आहे. हिंमत असेल तर थेट सामना करा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले.
काँग्रेसच्या विराट जनसंघर्ष यात्रेत ते बोलत होते. मंचावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, नसीम खान, मधुकरराव चव्हाण, राजू वाघमारे, बस्वराज पाटील, आ. डी. पी. सावंत, चारुलता टोकस, आ. अमरनाथ राजूरकर, महापौर शीला भवरे, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, उपमहापौर विनय गिरडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अशोकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विदर्भ म्हणजे महाराष्टÑ नव्हे, अशा शब्दात सरकारला सुनावत मागील चार वर्षांतील शासनाच्या कारभाराचा त्यांनी पाढा वाचला. भाजपा-सेनेची सत्ता आल्यापासून नांदेड शहरात काहीच होऊ द्यायचे नाही, यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. आता नांदेडकरांना पिण्याच्या पाण्यापासूनही वंचित ठेवण्याचा डाव रचला जात आहे. मात्र, नांदेडकर जनतेचा अशोक चव्हाण आणि काँग्रेसवर विश्वास आहे. विरोधकांनी कितीही खालच्या थराला जावून राजकारण करु द्या. तुमची साथ आणि नांदेडकरांच्या बळावर या शहराला काहीही कमी पडणार नाही, याचा विश्वास मी तुम्हाला देतो, असा शब्दही खा. चव्हाण यांनी दिला.
भाजप-सेनेच्या कारभारावरही त्यांनी खरमरीत टीका केली. केवळ आश्वासनाचे गाजर दाखविणाºया या सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठीचे एकही काम केले नसल्याचे सांगत आज देशातील सर्वोच्च यंत्रणा सरकारच्या भोंगळ कारभारामुळे संकटात सापडल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन लोकशाही धोक्यात आल्याचे सांगावे लागले. देशाने हे पहिल्यांदाच अनुभवले. हीच बाब आता सीबीआयवरील वादंगावरुन स्पष्ट होते. देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या सीबीआय कार्यालयाला दिल्ली पोलीस टाळे ठोकते, हा काय प्रकार सुरु आहे. असे सांगत या सरकारचे दिवस भरले आहेत. येणाºया निवडणुकीत विरोधकांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी माजी मंत्री नसीम खान यांचे भाषण झाले. नागपूरची विचारधारा घेऊन राज्यात विद्वेष पेरण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली. तर हर्षवर्धन पाटील यांनी नांदेडकरांचे कौतुक करीत येणाºया निवडणुकांतही काँग्रेसचा हा बालेकिल्ला अभेद्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणात सरकारचा कारभार अंधाधुंद सुरु असल्याची टीका करीत हे सरकार कारभार सांभाळण्यात अपयशी ठरल्याचे सांगत मतदार निवडणुकीची वाट पाहत आहेत. येणा-या निवडणुकीत भाजप-सेनेचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले. माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची असल्याचे सांगितले. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याला ‘व्हायरस’ लागलेले हे सरकार कायमचा ‘फॉरमॅट’ मारुन येणा-या निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून ‘डिलीट’ करा, असे आवाहन केले. सरकारमधून बाहेर पडण्याची उद्धव ठाकरे यांनी २३५ वेळा घोषणा केल्याचा चिमटाही त्यांनी काढला. मेळाव्याचे प्रास्ताविक आ. डी. पी. सावंत यांनी तर उपस्थितांचे आभार आ. अमरनाथ राजूरकर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी केले.
स्मार्ट सिटी योजनेतून नांदेडला का वगळले ? -विखे पाटील
काँग्रेसची सत्ता असताना गुरु-त्ता-गद्दी सोहळ्याच्या माध्यमातून नांदेडचा चेहरामोहरा बदलण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले. मात्र सेना-भाजप सरकारकडून नांदेडला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत सरकारने स्मार्ट सिटी योजनेतून नांदेडला का वगळले ? असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. चार वर्षांत चार आयुक्त आणि वर्षाला एक पालकमंत्री देवून नांदेडच्या विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न सरकारने केल्याची टीकाही पाटील यांनी केली. मात्र, नांदेड मनपातील विराट विजयानंतर राज्यच नव्हे, तर देशभरातील वातावरण काँग्रेसमय होत असून या सरकारची वेळ भरल्याचे ते म्हणाले.

Web Title: Conspiracy against Nanded by sitting in Mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.