नांदेड जिल्ह्यातील घरकुलांची कामे लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:41 AM2018-07-18T00:41:20+5:302018-07-18T00:42:01+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच इतर योजनांच्या माध्यमातून घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत. मात्र, वाळूअभावी कामे रखडल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यामार्फत केली जात होती. यासंबंधी बीडओंनी मागणी केल्यास घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली जाणार असल्याने रखडलेल्या घरकुलांची कामे आता मार्गी लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच इतर योजनांच्या माध्यमातून घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत. मात्र, वाळूअभावी कामे रखडल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यामार्फत केली जात होती. यासंबंधी बीडओंनी मागणी केल्यास घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली जाणार असल्याने रखडलेल्या घरकुलांची कामे आता मार्गी लागणार आहेत.
ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखाली जगणाºया कुटुंबांची संख्या मोठी आहे. हजारो लोकांना पक्के घर नसल्याने ते मातीच्या घरात जीवन कंठतात. अशा नागरिकांना हक्काचा पक्का निवारा देण्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री आवास याप्रमाणे इतर योजना राबविण्यात येतात. या योजनांना प्रशासनाने मंजुरी दिली असली तरी बहुतांश कामे अर्धवट अवस्थेत आहेत. याबाबत विचारणा केल्यानंतर वाळूचे कारण पुढे केले जात असल्याने जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी निर्देश देत गटविकास अधिकाºयांनी शासकीय घरकूल योजनेसाठी वाळूची मागणी केल्यास, मागणीनुसार वाळू उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. सद्य:स्थितीत एकट्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्धापूर तालुक्यात ९३, भोकर- ८४०, बिलोली १९१७, देगलूर - ११०३, धर्माबाद - ३७१, हदगाव - २८५, हिमायतनगर - ४१५, कंधार - १३०६, किनवट - ११३१, लोहा - ७६३, माहूर - ४७२, मुदखेड - ३८६, मुखेड - २४८६, नायगाव - १७७९, नांदेड - १९० तर उमरी तालुक्यात ३८० घरकुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. म्हणजेच जिल्ह्यात एकट्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतची १३ हजार ९१७ कामे अर्धवट आहेत. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता ही कामे पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.
---
लाभार्थ्यांचाही पुढाकार आवश्यक
नांदेड जिल्ह्यासाठी २०१६-१७ या वर्षामध्ये ११ हजार ५०७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. तर २०१७-१८ या वर्षात ६ हजार ४२५ आणि चालू आर्थिक वर्षात २ हजार १३० असे तीन वर्षांत २० हजार ६२ घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी केवळ ६ हजार १४५ घरे पूर्ण झाली आहेत. शासनाने लाभार्थ्यांना पहिली आणि दुसरी उचल देवू केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनीही आता घरबांधणीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
---
उद्दिष्टानुसार जिल्ह्यातील घरकुलांची कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे़ मात्र घरकुलाच्या रखडलेल्या कामाबाबत विचारणा केल्यानंतर वाळूअभावी कामे थांबल्याचे सांगितले जाते़ त्यामुळेच घरकुल योजनेसाठी मागणीनुसार वाळू उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
- अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी