उमरी येथे तक्रार निवारण बैठकीत महावितरणविरुद्ध ग्राहकांनी वाचला तक्रारींचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 04:50 PM2017-11-16T16:50:44+5:302017-11-16T16:55:26+5:30
तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची एक जंबो यादीच तयार झाली़ सावरगावच्या दलित वस्तीत पोल रोवून २५ वर्षे झाली अद्याप वीज जोडणी दिली नाही़ सरपंच बुक्तरे यांच्या या तक्रारीने महावितरणचे अधिकारी चिडीचूप झाले.
उमरी (नांदेड ) : महावितरणच्या तक्रार निवारण बैठकीत तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींची एक जंबो यादीच तयार झाली़. यावेळी सावरगावच्या दलित वस्तीत पोल रोवून २५ वर्षे झाली अद्याप वीज जोडणी दिली नाही़ सरपंच बुक्तरे यांच्या या तक्रारीने महावितरणचे अधिकारी चिडीचूप झाले. आ. वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या तक्रार निवारणाची बैठक पार पडली़ कार्यकारी अभियंता एम़एम़ गोपुलवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता शेख अब्दुल्ला, कनिष्ठ अभियंता सुनील कासनाळे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
डीपी जळाल्यावर शेतक-यांना स्वत:च्या खर्चाने डीपी आणावी लागते. त्यासाठी महावितरणचे कर्मचारी पैेसे जमा करतात, हा कोणता नियम आहे? असा प्रश्न कैैलास कुदळेकर यांनी केला़ सावरगाव येथील दलित वस्तीत २५ वर्षापूर्वी पोल रोवले़ आजपावेतो येथे तारा ओढल्या नाहीत व वीजजोडणी दिली नाही़ नवनवीन योजना दाखविण्यात येतात, मात्र प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याची खंत सरपंच बुक्तरे यांनी व्यक्त केली़ डीपी जळाल्यावर किती तासात नवीन डीपी बसविणार? भारनियमनाव्यतिरिक्त किती वेळ वीज देणार याचे लेखी उत्तर देण्याची मागणी नागेश सबनेडवार यांनी केली़
कृषीपंपाला सरासरी वार्षिक बिल आकारणी होते़ छोट्या शेतक-यांची यामुळे आर्थिक पिळवणूक होते म्हणून कृषीपंपाला मीटर बसविण्याची मागणी यावेळी अनेक शेतक-यांनी केली़ कारला येथे १५ दिवसापूर्वी डीपी काढून नेला, अद्याप बसविला नाही़, अशी तक्रार मोहनराव पवळे यांनी केली़ अस्वलदरी येथे वीज पुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठा बंद झाला़ इज्जतगाव पट्टी येथे १३ महिन्यापूर्वी कोेटेशन भरूनही वीज जोडणी दिली नाही़ दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी, दलित वस्तीसाठी अशा योजना जाहीर होतात, मात्र प्रत्यक्षात कसलाच फायदा नाही़ कारण तीन महिन्यापूर्वी ढोलउमरी येथील डीआरडी ग्राहकांसाठी अर्ज भरून वीज जोडणीची मागणी केली़ मात्र कसलीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार सरपंच येरावाड यांनी केली़
कळगाव येथे तारा खाली लोंबकळत असल्याने जिवितास धोका निर्माण झाला़ येथे विजेच्या शॉकमुळे गाय ठार झाली, अशी तक्रार बाालजी डांगे यांनी केली़ यावेळी समारोपाच्या भाषणात आ़वसंतराव चव्हाण यांनी अधिकारी व अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले़ १०० पैेकी २०-२५ लोकांच्या समस्यांचे निरसन होणे अपेक्षित आहे़ मात्र काहीच होत नाही, ही गंभीर बाब होय़ लोकांना उत्तरे द्यावीच लागतील़ दलित वस्ती, पुनर्वसित गावे, कृषीपंप आदींच्या मोठ्या तक्रारी आहेत़ लोकांचा अंत पाहू नका, वेळेवर दुरस्ती करून सेवा द्या, घोषित केलयाप्रमाणे निदान आठ तास तरी वीज द्या, उमरी तालुक्यासाठी किती ट्रान्सफार्मर आले, किती बसविले याची पूर्ण माहिती देण्याची सूचना आ़ चव्हाण यांनी केली़
कार्यकारी अभियंता गोपुलवाड यांनी येत्या मार्चच्या आत मीटर कनेक्शन देण्यात येतील व दारिद्रयरेषेखालील ग्राहकांना २ रुपये कोटेशनमध्ये वीज जोडणी देण्याची योजना असल्याचे सांगितले़ यावेळी आनंदराव यलमगोंडे, बालाजीराव जाधव, पं़स़ सदस्य चक्रधर गुंडेवार, प्रकाश पाटील चिंचाळकर, संजय कुलकर्णी, मोहनराव देशमुख, किशोर पबितवार, पांडुरंग पुदलवाड, एम़एम़ चंदापुरे, माधवराव बोळसेकर, बापुसाहेब येताळे, दिगांबर सावंत, ज्ञानेश्वर सरसे आदींसह असंख्य शेतकरी ग्राहकांची यावेळी उपस्थिती होती़ दिगंबर कदम यांनी सूत्रसंचालन केले तर सहाय्यक कार्यकारी अभियंता शेख अब्दुला यांनी आभार मानले़