नांदेड जिल्ह्यात दूषित पाण्याचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:21 AM2018-01-20T00:21:18+5:302018-01-20T00:22:10+5:30
उन्हाळा जवळ येऊ लागला तसे पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे किनवटसह जिल्ह्यातील काही भागावर पाणी -टंचाईचे सावट उभे आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल चार हजारांहून अधिक पाणी नमुने दूषित आढळले असून या ठिकाणचे पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : उन्हाळा जवळ येऊ लागला तसे पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. त्यामुळे किनवटसह जिल्ह्यातील काही भागावर पाणी -टंचाईचे सावट उभे आहे. दुसरीकडे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील तब्बल चार हजारांहून अधिक पाणी नमुने दूषित आढळले असून या ठिकाणचे पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जून-जुलैमध्ये माहूर, किनवटसह काही तालुक्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यासमोर पाणीटंचाईचा प्रश्न उभा आहे. दुसरीकडे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उपलब्ध पाणीसाठाही कमी होत असल्याचे चित्र असल्याने येत्या काळात टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागणार आहे.
ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तेथेही दूषित पाण्याचा प्रश्न उभा आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डिसेंबरमध्ये ग्रामीण व शहरी भागातून १ हजार ६३७ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी २४.८५ टक्के म्हणजेच ३४२ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले. याबरोबरच प्रगतीपर नमुन्यात जिल्ह्यातील १९ हजार ९३ पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या तपासणीचा अहवालही प्राप्त झाला असून यातील ४ हजार ७३ म्हणजेच सुमारे २१.२८ टक्के पाणी नमुने दूषित आढळल्याचे आरोग्य प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले आहेत तेथील वैद्यकीय अधिका-यांना याबाबत कळविले असून संबंधित ठिकाणच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करु नये, अशा सूचनाही दिल्या आहेत.