कोरोनानंतर बदलले घरातले किचन; हेल्दी पदार्थ वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:23+5:302021-06-16T04:25:23+5:30
पालेभाज्या, कडधान्य अन् सूप... जेवणामध्ये पालेभाज्यांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश घरातील किचनमध्ये आता दोन भाज्या बनू लागल्या आहेत, तर ...
पालेभाज्या, कडधान्य अन् सूप...
जेवणामध्ये पालेभाज्यांचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश घरातील किचनमध्ये आता दोन भाज्या बनू लागल्या आहेत, तर सोबत कडधान्य आणि सूपही घेतले जात आहे.
घरातील ज्येष्ठांना विविध भाज्या अथवा टाेमॅटो, आर्द्रक आदीपासून बनविण्यात आलेले सूप नियमितपणे दिले जात आहे.
पूर्वी नास्त्यामध्ये ब्रेड, मैद्यापासून बनलेले पदार्थाचे प्रमाण अधिक होते. परंतु, लाॅकडाऊनपासून नास्त्यातील पदार्थांची जागा फळ, मटकी, कडधान्यापासून बनवलेल्या पदार्थांनी घेतली.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दररोजच्या जेवणात हे हवेच
कोरोना आल्यापासून अनेकांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. त्यात दररोजच्या जेवणात काय घ्यावे इथपासून फॅमिली डाॅक्टरांचे सल्ले घेतले जात आहेत. त्यातून दररोजच्या जेवणात पालेभाल्या, काकडी, टोमॅटो, बीट, केळी, कांदा, लिंबू नियमितपणे सेवन करणे गरजेचे आहे. तसेच मोड आलेले कडधान्य खाण्याचे प्रमाणही वाढविणे गरजेचे आहे.
फास्ट फूडवर अघोषित बंदी
कोरोना आल्यानंतर लाॅकडाऊनमुळे फास्ट फूडची दुकाने बंद राहिली अन् अनेकांच्या जिभेचे चोचलेही बंद झाले. त्यात घरातील किचनमध्ये पौष्टिक पदार्थ बनण्याचे प्रमाण वाढले. आपसूकच फास्ट फूडवर अघोषित बंदीच घालण्यात आल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.
प्रतिक्रिया
लाॅकडाऊनमध्ये प्रत्येक जण म्हणजे अख्खे कुटुंबच सोबत होते. त्यामुळे कोणताही पदार्थ बनवला की खाणाऱ्यांची एकत्रित गर्दी होत असे. त्यामुळे करणाऱ्यांनाही आनंद होतो. त्यातून विविध पदार्थ बनविण्यात आले. कोरोनाच्या भीतीने पौष्टिक आहार, कडधान्यापासून बनविलेल्या पदार्थांवर अधिक भर होता. - रेखा भोसले, जयभवानीनगर.
नास्त्यामध्ये मोड आलेल्या पदार्थांबरोबरच लहान मुलांना नियमितपणे अंडी, दूध आणि ज्युस दिले जात आहे. त्याचबरोबर आरोग्यासाठी चांगला असलेला गुळवेल काढ्याचे नियमितपणे सेवन केले जात आहे. त्यातून प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत झाली.
- कृष्णा मंगनाळे, विद्युतनगर.
पूर्वी एकच भाजी बनविण्यात येत होती. परंतु, आता नियमितपणे सकाळच्या जेवणात दोन भाज्यांचा समावेश केला आहे. त्यात एक पालेभाजी अथवा कडधान्यापासून बनविलेल्या भाजीचा समावेश आहे. त्याचबरोबर गरमागरम जेवण, त्यामुळे जेवणाच्या सवयी आणि वेळा बदलल्या आहेत.
- सुधाताई सुकाळे, नांदेड