कोरोनाच्या आपत्तीमुळे भांडवलसधन वैद्यकीय सेवा झाली आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:05+5:302021-04-22T04:18:05+5:30
डॉ. व्यंकटेश काब्दे अमृत महोत्सव समितीतर्फे आयोजित ऑनलाइन विवेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्रास्ताविक डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले. ...
डॉ. व्यंकटेश काब्दे अमृत महोत्सव समितीतर्फे आयोजित ऑनलाइन विवेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्रास्ताविक डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले. याप्रसंगी डॉ.व्यंकटेश काब्दे म्हणाले, देशाच्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवेसाठी एक ते दीड टक्का तरतूद केली जाते, जी तुटपुंजी आहे. सर्वांना आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. कोरोनामुळे श्रीमंतांचे व कंपन्यांचे उत्पन्न वाढले आहे, याउलट गरीब व सर्वसामान्यांचे आर्थिक व सामाजिक नुकसान झाले आहे. प्रा. अभ्यंकर म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीत एकमेकांचे आरोग्य एकदुसऱ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे यापुढे स्वत:च्या आरोग्याच्या काळजीबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे संपूर्ण सामाजिक आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची बनली आहे. साथीच्या रोगात विमा कंपन्या टिकाव धरू शकणार नाहीत. प्रचंड गुंतवणूक केलेले खाजगी दवाखाने गरिबांना परवडणारी सेवा देऊ शकणार नाहीत. कोरोनामुळे व्यापार, उद्योग व सेवा क्षेत्रात मंदी आली असून, अनेकांचे रोजगार गेले आहेत; परंतु गरिबांचा रोजगार गेला तर तुमचाही रोजगार जातो हे भांडवलदारांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. श्रमिकांच्या, मध्यमवर्गीयांच्या हातातील खरेदी शक्ती वाढविण्यासाठी रोजगारवाढ हा महत्त्वाचा उपाय आहे. यासाठी ग्रामीण भागात सुशिक्षित व असुशिक्षितांसाठी रोजगार निर्माण केल्यास अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. अध्यक्षीय समारोपात कॉ. विजय गाभणे म्हणाले, कारोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर कुशल व अकुशल मानव संसाधन उपलब्ध आहे. त्याचा नियोजनपूर्ण वापर केल्यास कोरोनासारख्या आपत्तीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी केले. व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. पंढरी गड्डपवार, गजानन रासे व राहुल गवारे यांनी परिश्रम घेतले.