धान्य घोटाळ्यातील फरार आरोपीला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:17 AM2021-03-25T04:17:59+5:302021-03-25T04:17:59+5:30
नांदेड - राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील शासकीय धान्य घोटाळ्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या एका अधिकाऱ्याला कोरोनाने मात्र गाठले ...
नांदेड - राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील शासकीय धान्य घोटाळ्यात गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या एका अधिकाऱ्याला कोरोनाने मात्र गाठले आहे. सीआयडीला हा अधिकारी गुंगारा देत असून, कोरोनाची लागण झाल्यामुळे आठ दिवस हिंगोली येथील रुग्णालयात उपचार घेत होता. आता प्रकृती आणखी ढासळल्यामुळे त्याला हैदराबाद येथे हलविण्यात आले आहे. शासकीय धान्याची खासगी कंपनीत विल्हेवाट लावण्यात येत होती. तत्कालिन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करुन हा धान्य घोटाळा उघडकीस आणला होता. त्यानंतर कंपनीच्या संचालकासह यामध्ये अनेकांना अटक झाली होती. हे सर्वजण आता जामिनावर बाहेर आहेत. तर एका अधिकाऱ्याचाही यात समावेश आहे. या अधिकाऱ्याने यापूर्वी अनेकवेळा बिलोली, नायगाव आणि औरंगाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. हा अधिकारी सापडत नसल्याने न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या आरोपीला कोरोनाने मात्र आपल्या तावडीत पकडले आहे. गेल्या आठ दिवसांपासून हिंगोलीच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. बुधवारी प्रकृती आणखी ढासळल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे हलविण्यात आले आहे. याबाबत पोलिसांना काेणती माहिती आहे, हे मात्र अद्याप कळू शकले नाही.