कोरोनामुळे डोळे उघडले; शहरामध्ये रुग्णालये वाढली, सुविधाही वाढल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:20+5:302021-07-01T04:14:20+5:30
नांदेड : सरकार कोणतेही असो, आरोग्य व्यवस्थेकडे नेहमी दुर्लक्षच करण्यात येते. परंतु आता कोरोनामुळे यंत्रणेचे डोळे उघडले असून, गेल्या ...
नांदेड : सरकार कोणतेही असो, आरोग्य व्यवस्थेकडे नेहमी दुर्लक्षच करण्यात येते. परंतु आता कोरोनामुळे यंत्रणेचे डोळे उघडले असून, गेल्या दीड वर्षात आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. ऑक्सिजन टँक, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, खाटा यासह कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्यानिमित्ताने का होईना जिल्ह्यातील आरोग्य सेवेने कात टाकली आहे.
जिल्ह्यात आजघडीला जिल्हा रुग्णालयात दोन, विष्णूपुरीला दोन ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर किनवट, माहूर यासह काही तालुक्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात नांदेडला ऑक्सिजनसाठी इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.
जिल्हा आणि शासकीमध्ये खाटा वाढल्या
जिल्हा रुग्णालयात यापूर्वी केवळ ७० खाटा होत्या. कोरोनाच्या काळात दोनशे खाटांची इमारत तातडीने सुरू करण्यात आली. तसेच या ठिकाणी व्हेंटिलेटर, खाटा यासह इतर सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या. त्यामुळे एकावेळी अडीचशेहून अधिक रुग्णांवर उपचार करता आले. वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेदिकमध्ये खाटा पुरविण्यात आल्या.
रुग्णसेवेने टाकली कात
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षाही दुसरी लाट भयंकर होती. पहिल्या लाटेनंतर काही दिवसांचा अवधी मिळताच ऑक्सिजन टँक उभारणे, खाटा उपलब्ध करून देणे, व्हेंटिलेटर यासह कर्मचारी भरती एकाचवेळी युद्धपातळीवर करण्यात आली. त्यामुळे हजारो रुग्णांची गैरसोय दूर झाली. कोरोनाच्या काळात झालेल्या या कामांचा लाभ आता रुग्णांना मिळणार आहे. - डॉ. नीळकंठ भोसीकर, सीएस