Corona Virus : हद्द झाली ! बिलासाठी मृत्यूनंतरही खाजगी रुग्णालयाने तीन दिवस केले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:42 PM2021-05-19T12:42:38+5:302021-05-19T12:44:23+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड : कोरोना काळात खाजगी रुग्णालयात होत असलेल्या लुटीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु बिलाची रक्कम येणे बाकी असल्याने मृत्यूनंतर ही एका कोरोना रुग्णावर तब्बल तीन दिवस उपचार करण्याचा प्रताप नांदेड मधील गोदावरी हॉस्पिटलने केला आहे. मयताच्या पत्नीने या विषयाचा भांडाफोड केला असून न्यायालयाच्या आदेशाने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुजामपेठ येथील अंकलेश पवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची पत्नी शुभांगी पवार यांनी त्यांना शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये 16 एप्रिल 2021 रोजी दाखल केले होते. या ठिकाणी दाखल करताना त्यांच्याकडून अनामत म्हणून 50 हजार रुपये भरून घेण्यात आले. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. त्यातच 20 एप्रिल रोजी त्यांना आयसीयू मध्ये हलविल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच दिवशी टॉमीझुलब नावाचे 35 हजार रुपयांचे इंजेक्शन द्यावे लागणार असून पैसे जमा करण्यास सांगितले होते. शुभांगी यांनी पैसे भरण्यासाठी मुदत मागितली होती, रुग्णालयाने त्यांना 24 एप्रिलपर्यंतची परवानगी दिली होती.
24 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शुभांगी यांनी रुग्णालयात 90 हजार रुपये जमा केले. त्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांना अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शुभांगी यांनी डेड बॉडी आणि उपचाराच्या कागदपत्रे मागितली परंतु रुग्णालयाने ती देण्यास नकार दिला. त्यानंतर 26 एप्रिल रोजी त्यांना उपचाराची कागदपत्रे देण्यात आली. त्यात अंकलेश पवार यांचा 21 एप्रिल रोजी 12 वाजता निधन झाल्याची नोंद असल्याचे धक्कादायक पुढे आले. विशेष म्हणजे 21 ते 24 या तिन्ही दिवसांची उपचाराची बिले लावण्यात आली होती. अशाप्रकारे जादा बिल आकारून ही प्रेताची विटंबना केल्याने शुभांगी यांना धक्का बसला. त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता आणखी 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात शुभांगी यांनी ऍड शिवराज पाटील यांच्या मदतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.