Corona Virus : डायलेसीस रूग्णाला लॉकडाऊनचा फटका; बैलगाडीतून ऐंशी किलोमिटरचा प्रवास करत गाठले रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:34 PM2020-03-28T12:34:49+5:302020-03-28T12:36:51+5:30
संचारबंदीच्या भीतीने वाहने बंद
नांदेड : संचारबंदीच्या भितीने कोणी वाहनधारक रूग्ण घेवून जाण्यास तयार नसल्याने एका डायलेसिसवरील रूग्णास चक्क एेंशी किलोमिटरहून बैलगाडीतून रूग्णालयात दाखल करण्यात आले़ हा धक्कादायक प्रकार केवळ अज्ञानातून घडला
आहे.
नांदेड जिल्ह्यातील पळसगाव ता़ उमरी येथील रोहिदास भीमराव पवळे हे वयोवृद्ध सध्या डायलेसिसवर आहेत. त्यांना आठवड्यातून दोन वेळा, रक्त बदलावे लागते़ त्यांना गावाकडून रेल्वे अथवा खाजगी वाहनाने नांदेड शहरात आणले जात असे़ परंतु, २३ मार्चच्या मध्यरात्री संचारबंदी लागू करण्यात
आली आणि सदर रूग्णांच्या नातेवाईकांनी धास्ती घेतली़
लॉकडाऊनमुळे सर्वच वाहने बंद असल्याने रूग्णालयात पोहोचायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला़ कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून संचारबंदी लागू केल्याने
नांदेडला येण्यास वाहनाची व्यवस्था होत नव्हती़ त्यामुळे भयभीत झालेल्या पवळे कुटुंबियांनी सदर रूग्णास बैलगाडीतून नांदेडात नेण्याचे ठरविले आणि रात्री दोन वाजता पळसगावातून बैलगाडी निघाली़ तब्बल ऐंशी किलोमिटरचा हा प्रवास करून पवळे हे मंगळवारी सकाळी १० वाजता नांदेडात पोहोचले़
त्यांच्यावर उपचार करून रक्त चढविण्यात आले़ परंतु, त्यांच्यासारखी अवस्था इतर रूग्णाची होवू नये, याची काळजी प्रशासनाने घेणे गरजेचे आहे़ दरम्यान, कोरोनाला फाईट देत जुन्या रूग्णांना रूग्णसेवा, वेळेवर औषधी, रूग्णवाहिका, सरकारी १०८ गाडी वेळवर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी अतिरिक्त रूग्णवाहिका, १०८ गाड्यांची तयारी प्रशासनाने ठेवणे गरजेचे आहे़