Corona Virus in Nanded : भाजीपाला सडतोय शेतातच; आठ दिवसांपासून बाजार समितीचा व्यवहार पूर्णपणे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 03:03 PM2020-03-26T15:03:53+5:302020-03-26T15:05:47+5:30
बाजारसमिती परिसरात संचारबंदीने शुकशुकाट
नांदेड : जिल्ह्यात जवळपास पंधरा दिवसापासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. परिणामी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सर्व व्यवहार 20 मार्च पासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात 13 मार्च पासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे आणि त्यानंतर शासनाने संचारबंदी लागू केली. जिल्हा सीमा बंद करण्याच्या सूचना केल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेता आणि ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना काही ठिकाणी पोलिसांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातून शहरात यायला कोणी हिंमत करत नाही. त्यामुळेच भाजीपाला आणि दूध, गहू आदी मालाची आवक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनाही सहन करावा लागत आहे. बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल भाजीपाला शेतातच सडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचा फटका शहरी भागातील जनतेनेलाही सहन करावा लागत आहे. काही भाजीपाला विक्रेते आपल्याकडे उपलब्ध असलेला भाजीपाला चढ्या भावाने विक्री करत आहेत तसेच पुढे किती दिवस बंद राहील अशी भीती ग्राहकांना घालून जो माल उपलब्ध आहे तो त्यांच्या माथी मारण्याचे काम केले जात आहे. तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून कोणीही भाजीपाला घेत नसल्याचे कारण देत भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने भाजीपाला घेत आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा अनेक भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या गावात भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. त्यांची बैठक घेऊन सदर माल संबंधित बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी
कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या व्यावसायिकांवर शासनाने कारवाई करावी तसेच शेतमाल उत्पादन करणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ठिकाणी शहरात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी त्याच बरोबर त्यांना पोलीस प्रशासनाकडून कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि ग्रामसेवक, सरपंच यांना सूचना देऊन भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य, मार्गदर्शन करावे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी डॉ विठ्ठलराव विखे- पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.