Corona Virus : लॉकडाऊनमुळे उमरीत अडकले त्रिपुरा,ओडीसासह राजस्थानचे मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 10:02 PM2020-03-28T22:02:22+5:302020-03-28T22:03:37+5:30
रोजगार बंद असल्याने मजूर चिंतेत
उमरी ( नांदेड ) : शहरात कामधंद्यासाठी आलेले एका महिलेसह १६ परप्रांतीय नागरिक लॉकडाऊनमूळे अडकले आहेत. परत गावाकडे जाण्यासाठी सध्या कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण झाली आहे .
शहरातील ३३ के.व्ही विद्युत उपकेंद्रा समोरील मुरमुरा भट्टीत तसेच बसस्थानकाजवळील एका घरात भाड्याने असलेले एकूण पंधरा पुरुष व एक महिला असे सोळा नागरिक अडकून पडले आहेत. कोरोना साथीमुळे सध्या सर्वच व्यवहार बंद पडल्याने यांचाही रोजगार बंद झालेला आहे . आता या सर्व नागरिकांना परत गावाकडे जायचे आहे.
या नागरिकांमध्ये त्रिपुरा - कबरापल्ली , संबलपूर - ओडिसा , बिस्सूकलान , बारमेर - राजस्थान आदी राज्यातील हे मजूर आहेत. यातील बहुतांश लोकांचे हजारो किलोमीटरवर गावे असून त्यांना त्यांच्या गावांमध्ये पोचविणे प्रशासनालाही अशक्यप्राय झालेले आहे. म्हणून परप्रांतातील नागरिक ज्या ठिकाणी आहेत तेथेच त्यांची व्यवस्था करण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे. असे असले तरीही कोरोना बाबतचा कर्फ्यू अजून पुढे किती दिवस चालेल व किती दिवस रोजगार बंद राहतील . याबाबत शाश्वती नाही याचीही चिंता या नागरिकांना लागलेली आहे.