corona virus : आता प्रवाशांना मागणी केल्यावरच मिळणार रेल्वेत पांघरुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:22 PM2020-03-16T14:22:14+5:302020-03-16T14:24:55+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय
नांदेड : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात आता प्रवाशांना सरसकट पांघरुण मिळणार नाही़ प्रवाशांनी मागणी केल्यासच त्यांना पांघरुण देण्याचा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे़
रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात यापूर्वी प्रवाशांना सरसकट पांघरुण देण्यात येत होते़ परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रवाशांना पांघरुण देण्यात येणार नाही़ प्रवाशांनी मागणी केली तरच पांघरुण देण्यात येणार आहे़ परंतु उशी आणि अंथरुण मात्र सरसकट देण्यात येणार आहे़ वातानुकूलित डब्यातील तापमान देखील २३ ते २५ अंशांपर्यंत ठेवण्यात येणार आहे़ महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकडून वापरण्यात येणाऱ्या भागांचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेने घेतला आहे़
येत्या १५ एप्रिलपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत़ रेल्वेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ फलाट आणि इतर आसन व्यवस्थेचीही स्वच्छता करण्यात येत आहे़ त्यादृष्टीने रेल्वेचे कर्मचारी कामाला लागले असून वरिष्ठ अधिकारीही परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.