CoronaVirus : ‘लॉकडाऊन’चा फटका; उत्तर भारतातील २५ हजार नागरिक अडकले रेल्वेच्या नांदेड विभागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:45 PM2020-04-15T12:45:24+5:302020-04-15T12:52:54+5:30
3 मे पर्यंत कुठलीही प्रवाशी रेल्वे नाही, प्रशासनाचे स्पष्टीकरण
- श्रीनिवास भोसले
नांदेड : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला़ या काळात अचानक वाहतूक व्यवस्था बंद करून तालुका, जिल्हा अन् राज्य सीमा सील केल्याने हजारो नागरिक कर्तव्यावर असणा-या ठिकाणी अडकले आहे़. दमरेच्या नांदेड विभागात उत्तर भारतातील २५ हजारावर नागरिक अडकल्याची माहिती समोर येत आहे़
जगावर कोरोना महामारीचे सावट आल्याने सर्वच देशानी कोव्हीड १९ या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विमानसेवा बंद केली़ त्यापाठोपाठ देशातील राज्य आणि जिल्हा सीमाही सील केल्या़ परिणामी हजारो लोक कर्तव्यावर असणाऱ्या ठिकाणी अथवा उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण घेण्यासाठी असलेल्या शहरांमध्ये अडकले आहेत़ देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन असल्याने १४ एप्रिलनंतर परिस्थिती पूर्ववत होईल, अशी आशा होती़ परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी सकाळी पुन्हा देशात ३ मेपर्यंतचा लॉकडाऊन घोषित केला आहे़ त्यामुळे परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रात इतर राज्यातील अडकलेल्या नागरिकांना स्वगृही परतण्यासाठी काही उपाय योजना करण्याची गरज आहे़ त्याअनुषंगाने परप्रांतातील किती प्रवाशी राज्यात अडकले आहेत याचा अंदाज घेतला जात आहे़.
औरंगाबादमध्ये १० हजारावर प्रवाशी
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास २५ हजारांवर नागरिक अडकले असून त्यात सर्वाधिक उत्तर भारतातील प्रवाशी आहेत. सर्वाधिक औरंगाबादमध्ये जवळपास १० हजार, नांदेडमध्ये ४ हजार, हिंगोली अडीच हजार, परभणी दिड हजार, जालना दिड ते दोन हजार, वाशिम दोन हजार, अदिलाबाद भागात ५०० ते ६००, अकोला जिल्ह्यात जवळपास अडीच हजार नागरिक वाढले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़
परराज्यातील हजारो शिख बांधव नांदेडातच
शिखांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्य नांदेडात श्री हुजूर साहिब सचखंड गुरूद्वारा दर्शन घेण्यासाठी पंजाब, दिल्ली, हरियाणा राज्यातून आलेले जवळपास तीन हजार शिख भाविक नांदेडात अडकले आहेत़ त्यांची लंगर साहिबकडून राहणे, जेवनाची व्यवस्था केली आहे़ परंतु, त्यांना स्वगृही जाण्याची ओढ लागली आहे़ यातील बहुतांश भाविक खासगी वाहने करून निघून गेले़ परंतु, अडीच हजारावर भाविक आजही गुरूद्वाºयाच्या निवासस्थानात मुक्कामी आहेत़ तर शहरात इतर राज्यातून शिक्षण, व्यवसायानिमित्त आलेल्यांची संख्याही मोठी आहे़
राज्यस्थानमध्ये अडकले विद्यार्थी अन् पालक
नीट, जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यस्थानमधील कोटा शहरात गेलेले महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी आणि पालक लॉकडाऊनने तिकडेच अडकले आहेत़ परीक्षांच्या तारखा लांबविल्याने सदर विद्यार्थी - पालकांना राज्यात घेवून येण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे़ यामध्ये बहुतांश विद्यार्थी आणि त्यांची आई सोबत राहत आहेत़ त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे़
रस्त्यांच्या कामावरील मजूराना लागली ओढ
राज्यभरात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाची आणि रेल्वे दुहेरीकरण करण्याची कामे सुरू आहेत़ या कामांवर राज्यस्थान, बिहार, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील हजारो मजूर असून ते सध्या कामाच्या ठिकाणीच अडकले आहेत़ लॉकडाऊन किती दिवस राहील आणि परराज्यातील असल्याने नागरिकांचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलत असल्याने भीतीपोटी आपल्या राज्यात जाण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे़
3 मे पर्यंत कुठलीही प्रवाशी रेल्वे नाही, प्रशासनाचे स्पष्टीकरण
प्रवासी कामगारांसाठी स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय म्हणून काही विभागांमध्ये रेल्वे सेवांच्या मागणीचे आकलन करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या अंतर्गत नियोजनाशी संबंधित संवादाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, 3 मेपर्यंत कुठल्याही प्रवासी रेल्वे चालविण्याचे नियोजन नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.