coronavirus : ६५ वर्षीय महिलेची दमदार झुंज; २६ दिवसानंतर केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 07:46 PM2020-06-15T19:46:38+5:302020-06-15T19:53:09+5:30

योग्य उपचार मिळाल्यास कोरोनावर यशस्वीपणे मात करता येवू शकते. याचा प्रत्यय सोमवारी नांदेडकरांना आला.

coronavirus: A 65-year-old woman overcomes coronavirus after fighting for 26 days | coronavirus : ६५ वर्षीय महिलेची दमदार झुंज; २६ दिवसानंतर केली कोरोनावर मात

coronavirus : ६५ वर्षीय महिलेची दमदार झुंज; २६ दिवसानंतर केली कोरोनावर मात

Next
ठळक मुद्देरुग्णालयातून मिळाली सुट्टी अन्य दोघेही कोरोनामुक्त

नांदेड : कोरोनाची भीती सर्वांनीच घेतली आहे. मात्र आत्मविश्वासाने उपचारास सामोरे गेल्यास तसेच वेळेत योग्य उपचार मिळाल्यास कोरोनावर यशस्वीपणे मात करता येवू शकते. याचा प्रत्यय सोमवारी नांदेडकरांना आला. मधुमेहासह उच्च रक्तदाबाने आजारी असलेल्या ६५ वर्षीय कोरोनाबाधित वयोवृद्धेने २६ दिवस मृत्यूशी झुंज देवून कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या बरोबरच इतर दोन रुग्णही सोमवारी कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या १७७ झाली आहे.

गाडीपुरा परिसरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळल्याने १९ मे रोजी विष्णूपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे या महिलेला अनियंत्रित मधुमेहासह उच्च रक्तदाब असे दोन्ही आजार होते. रुग्णालयात दा्नखल केल्यानंतर डॉक्टरांनी परिस्थितीनुसार तातडीने उपचारास सुरुवात केली. मात्र तपासणीनंतर तिच्या दोन्ही फुफुसात गंभीर निमोनिया संसर्ग झाल्याचे आढळून आले. यावर डॉक्टरांनी उपाययोजना सुरू केल्या. मात्र निमोनियाच्या संसर्गामुळे या वृद्धेला श्वसनाचाही त्रास होऊ लागला. त्यामुळे कृत्रिम श्वासोश्वास देवून उपचार करण्यात आले. अखेर २६ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर  या महिलेने कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याचे दिसून आले. त्यामुळे या महिलेला कोरोनामुक्त झाल्याने  सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

या महिलेवर उपचार करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. भुरके, डॉ. शितल राठोड, डॉ. विजय कापसे, डॉ. उबेदुल्लाखान आणि डॉ. कपिल मोरे आदीच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, वैैद्यकीय अधिकारी डॉ. वाय.एच. चव्हाण, नोडल अधिकारी डॉ. संजय मोरे आदींनी  सोमवारी सदर महिलेचे कौतुक केले. दरम्यान, सोमवारी अन्य दोन रुग्णही कोरोनामुक्त झाल्याने त्यांनाही रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यामध्ये एका ४२ वर्षीय अभियंत्यासह ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: A 65-year-old woman overcomes coronavirus after fighting for 26 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.